नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणार्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधक आमच्या लष्कराची सतत बदनामी करीत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. विरोधकांच्या या माकडचेष्टांना देशातील 130 कोटी जनता कधी विसरणार नाही आणि त्यांना माफही करणार नाही, असे टीकास्त्रही पंतप्रधानांनी ट्विटरवरून सोडले आहे.
पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी, भारताने खरंच असा हल्ला केला का? आपण खरोखरच 300 दहशतवादी मारले जर असेल तर त्याचा पुरावा मिळायला हवा. काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही. भारताने केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मत व्यक्त केले आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. सर्वात विश्वासू सल्लागार आणि काँग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सुरक्षा दलांचा अपमान करीत काँग्रेसच्या वतीने पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका मोदींनी केली.
‘काँग्रेसच्या शाही घराणेशाहीच्या निष्ठावंतांनी जे देशाला आधीपासून माहीत आहे की, काँग्रेसला कधीच दहशतवादाला उत्तर द्यायचे नव्हते ते पुन्हा सांगितले आहे. हा नवा भारत आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल,’ असेही मोदींनी म्हटले.
‘विरोधक वारंवार आपल्या सुरक्षा दलांचा अपमान करीत आहेत. मी माझ्या सहकारी भारतीयांना आवाहन करतो की, त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा. भारतीय आपल्या सुरक्षा दलांसोबत ठाम उभे आहेत, असेदेखील मोदींनी सांगितले.