5जी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करीत आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर सकाळी 10 वाजता 5जी सेवेचा शुभारंभ होईल. 5जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5जी तंत्रज्ञान ऊर्जा, स्पेक्ट्रम व नेटवर्क सक्षमताही वाढवेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये कार्यक्रम
पनवेल ः पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि. 1) सकाळी नवीन पनवेलमध्ये 5जी सेवेचा शुभारंभ राज्यात करणार आहेत. ही सेवा सुरू करण्यासाठी राज्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली असून त्यात पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेलमधील पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीतून 5जी सेवेचा शुभारंभ सकाळी 10 वाजता करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे पोदी शाळेत उपस्थित राहून राज्यात शुभारंभ करतील. या वेळी पंतप्रधान 5जी सेवेमार्फत मुख्यमंत्री, विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री कामोठे येथील रामशेठ ठाकूर विद्यालय, पनवेलमधील महात्मा व डीएव्ही शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधतील. या वेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, आयुक्त गणेश देशमुख उपस्थित राहणार आहेत.