भाजप नेते महेश बालदी यांचा हल्लाबोल
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वार्थ आणि सत्तेसाठी इतर पक्षांच्या वळचणीला गेलेली शेकापची मंडळी कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने आता जातीयवाद करू लागली आहेत, परंतु भाजप, शिवसेनेने अशा गोष्टींना कधीही थारा दिला नाही. शेकाप तिकीट नाकारतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीची शपथ घेऊन भाजपमध्ये आलेले एका रात्रीत पुन्हा तिकीट मिळतेय म्हणून शेकापत घुमजाव करतात. अशाप्रकारे छत्रपतींचा अवमान करणार्यांना जनताच धडा शिकवेल, असा हल्लाबोल जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 22) बारापाडा येथे केले. ते कर्नाळा ग्रामपंचायतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष आघाडीच्या परिवर्तन आघाडीतर्फे आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर बारापाडा येथे सभेत झाले. त्या वेळी बालदी बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, भाजप तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, वासुदेव घरत, साईचे सरपंच विद्याधर मोकल, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकाप पुढार्यांनी केवळ गावागावात भांडणे लावण्याचे काम केले. मुस्लीम बांधवांची मतेही फक्त फायद्यासाठी घेतली. वाशी खाडीच्या पलीकडे यांची मजल गेली नाही. यांना विकासाची व्याख्या काय कळणार? मंत्रालयच माहीत नाही; तर हे निधी कुठून आणणार. पनवेलला आमदार प्रशांत ठाकूर यांनी जी विकासाची गंगा आणली आहे ते पाहता शेकापच्या माजी आमदारांचे ठळक काम त्यांनी दाखवावे, असे आव्हान महेश बालदी यांनी दिले. आज शेकापची सर्व ठिकाणी हार होत आहे. ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी आमदारकीही विसरून जावी, कारण जनता सुजाण झाली असून, तुमच्या थापांना बळी पडणार नाही. विकासासाठी कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास महेश बालदी यांनी व्यक्त केला.
जशास तसे उत्तर देऊ : आमदार मनोहर भोईर
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुुख आमदार मनोहर भोईर म्हणाले की, कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये शेकापची सत्ता असल्याने आपण विकासकामे आणली, तर हे ठरावात घेत नाहीत, कारण यांना विकास नको. यांच्यात ती पात्रताच नाही. त्यामुळेच विकासासाठी येत्या 25 तारखेला कर्नाळा ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार आहे. तेव्हा कोणी दादागिरी करीत असेल; तर ते चालणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल!
शेकापला विकास नको. यांना फक्त सत्ता पाहिजे. ही मंडळी सर्वसामान्यांची साध्या दाखल्यासाठी अडवणूक करतात. म्हणून 2019ची निवडणूक परिवर्तनाची आहे. त्यामुळे नागरिकांनी विकासकामे करणार्या परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.
-अरुणशेठ भगत, अध्यक्ष : पनवेल तालुका भाजप