Thursday , March 23 2023
Breaking News

भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात!

प्रवीण छेडा स्वगृही परतले; राष्ट्रवादीच्या भारती पवारही ‘कमळा’कडे आकर्षित

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी शुक्रवारी (दि. 22) ‘कमळ’ हाती घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे भाजपमध्ये स्वागत केले.

या वेळी भाजपचे खासदार संजय काकडे उपस्थित होते. काकडे यांची नाराजी दूर झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रवीण छेडा आधी भाजपमध्ये होते. मतभेदानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची आता घरवापसी झाली आहे. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. छेडांसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. पवार यांनी 2014मध्ये दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. या वेळी राष्ट्रवादीने पवारांना तिकीट नाकारत धनराज महालेंना संधी दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी माढ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता.

गौतम गंभीर भाजपच्या टीममध्ये

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने शुक्रवारी (दि. 22) भाजपचा झेंडा हाती घेतला. गौतम गंभीरला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करीत असून, गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केल्याने या नव्या चेहर्‍याला संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply