भारत-चीन दरम्यानच्या लष्करी संघर्षात वीस जवानांचा बळी गेल्यानंतर देशातील जनमानसातील चीनविरोधाची धार तीव्र झाली असून जनतेने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चीनविरोधी संताप व्यक्त केला आहे. चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी यातून जोमाने पुढे येत आहे.
हिमालयाच्या खोर्यात भारत-चीन सीमाभागात गेला महिनाभर अधून मधून तणावपूर्ण स्थिती निर्माण होत होतीच. डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव सुरु झाला आणि बघता बघता अवध्या जगाला अभूतपूर्व अशा कोरोना संकटाने वेढले. चीनमध्ये हा फैलाव नेमका कसा सुरु झाला याविषयी ठामपणे खात्री देता येईल असा उलगडा अध्यापही झालेला नाही. कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून चीनची त्यासंदर्भातील भूमिका संशयास्पद राहिली आहे. जगभर लाखो बळी घेणार्या कोरोना महामारीमुळे तजगभरातच चीनविरोधाची भावना गेल्या काही महिन्यात निर्माण झाली आहे. महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा चीनविरोध सर्वाधिक उघडपणे वेळोवेळी व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एकटे पडल्यानंतरही चीनने मात्र राजकीय, आर्थिक वा लष्करी यापैकी कुठल्याच आघाडीवर नमते घेतल्यासारखे या सहा महिन्यांच्या काळात दिसलेले नाही. उलटपक्षी आर्थिक महासत्ता म्हणून अधिक जोरात मुसंडी मारुन पुढे येण्याचे प्रयत्नही याकाळात चीनने बेदरकारपणे केले. भारत आणि अमेरिका यांचे एकमेकां सहाय्य करु धोरण चीनला निश्चितच खटकले असणार. पण आपण कोणाला जुमानत नाही, हे दाखवण्यासाठीच चीनकडून भारतालगतच्या सीमा भागात गेला काही काळ घुसखोरीवजा आगळीक सुरु आहे, असे म्हणायला हरकत नाही. भारताने कलम 370 रद्द करुन लडाखचा भाग केंद्रशासित केल्यापासून तिथे आपला वरचष्मा दाखवण्याची खुमखुमी चीनकडून अधून मधून नजरेस पडतच होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनने हेतुपुरस्सर सीमा भागात भारताशी आगळीक केली असणार, हे उघड आहे. लडाखच्या गलवान खोर्यात झालेल्या संघर्षात वीस भारतीय जवानांचा बळी गेल्याने देशभरात दु:ख आणि संतापाची भावना निर्माण झाली. आपले जवान हे लढता लढता शहीद झाले असून या चकमकीत चीनच्या सुमारे 43 सैनिकांचा खात्मा झाल्याचे वृत्त काही विदेशी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. चीनने मात्र यासंदर्भात मौनच बाळगले असून या संघर्षाला जबाबदार असणार्यांना शिक्षा ठोठावली जावी अशी कांगावाखोर मागणी भारताकडे केली आहे. भारताने मात्र या संपूर्ण प्रकरणावर ठाम भूमिका घेतली असून भारतीय जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला ठणकावले आहे. भारत हा शांतता प्रेमी देश आहे. परंतु अकारण कोणी आगळीक केल्यास सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम आहे असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यासंदर्भात मोदी शुक्रवारी सर्व पक्षीय बैठक घेणार असून त्यानंतर रविवारी ते देशाला संबोधित करतील. जगासमोरील सध्याची आव्हाने लक्षात घेता दोन्ही देशांवर राजनैतिक चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी दबावही आहेच. त्यानुसार राजनैतिक चर्चांना एव्हाना सुरुवातही झाली आहे. दरम्यान जनतेतूनच वेळोवेळी पुढे येत असलेल्या चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या मागणीची अंमलबजावणी जनतेने स्वयंस्फूर्तीने करायला हरकत नाही. देशाला आत्मनिर्भर करण्याची हाक पंतप्रधानांनी दिलेलीच आहे. तेव्हा त्या धोरणाशीही ते सुसंगतच ठरेल. चिनी उत्पादने दर्जाहीन असल्याबद्दल विनोद करत रहण्यापेक्षा त्यांच्याकडे पाठ फिरवणेच अस्सल राष्ट्रभक्ताला साजेसे ठरेल.