Breaking News

भारत चोख उत्तर देण्यास सक्षम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ठणकावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. या वेळी बोलताना त्यांनी भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही, पण डिवचले तर वेळ आल्यावर भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे, अशा शब्दांत चीनला ठणकावले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 17) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा उल्लेख करीत भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हटले. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना उभे राहून शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आम्ही नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण पद्धतीने काम केले आहे. सदैव त्यांच्या विकासासाठी प्रार्थना केली आहे. अनेकदा आमच्यात मतभेदही झाले आहेत, पण वाद होऊ नयेत यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आम्ही कधीच कोणाला डिवचत नाही, पण जेव्हा कधी वेळ आली आहे तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले आहे. आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. विक्रम आणि वीरताही देशाच्या चरित्राचा भाग आहे.
भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास मला देशवासीयांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. याबाबत कुणाच्या मनातही जरासाही भ्रम किंवा संशय नको, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे, असेही या वेळी पंतप्रधानांनी नमूद केले.
उद्या सर्वपक्षीय बैठक
लडाखमध्ये गलवान खोर्‍यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. शुक्रवारी (दि. 19) संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply