Breaking News

युगे अठ्ठावीस

आषाढ महिना लागला की अवघ्या महाराष्ट्राला वारीचे वेध लागतात. कानांमध्ये जणू टाळ-मृदुंगाचा नाद ऐकू येऊ लागतो आणि मन पंढरी रायाच्या दर्शनासाठी आसावते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली पायी वारी रद्द करणे भाग पडले आहे.

गेले जवळपास सहा महिने कोरोनाने जगभरात थैमान घातले असून मार्च महिन्यात आपल्या देशात या घातक विषाणूचा शिरकाव झाल्यापासून दुर्देवाने रूग्णसंख्या आणि बळी या दोन्ही बाबतीत महाराष्ट्रच आघाडीवर आहे. अफाट वेगाने पसरणार्‍या या साथीच्या संकट काळात धार्मिक कार्यक्रमासाठी होणारी गर्दी किती घातक ठरु शकते हे तबलिघींच्या प्रकरणात अवघ्या देशाने पाहिले. परंतु या भीषण संकट काळात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आलेल्या सूचनांनुसार सर्व दक्षता घेत असतानाही अनेकांना श्रद्धेचा आधार वाटतो. वैज्ञानिक सत्याचे महत्व जाणणार्‍या ज्येष्ठ-श्रेष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनीही अनेकदा श्रद्धेचे अपार महत्व मान्य केले आहे. जिथे शास्राच्या आधारे केले जाणारे वैद्यकीय उपचार थकतात तिथे अनाहुतपणे श्रद्धा हात देऊन जाते. त्यामुळेच श्रद्धेचे महत्व कोणीही नाकारु नये. श्रद्धेच्याच आधारे सर्वसामान्य माणूस आपला जगण्याचा संघर्ष न थकता पुढे रेटीत असतो. या श्रद्धेचा आदर म्हणूनच ओडिशातील पुरी येथील रथ यात्रेला आधी नाकारलेली परवानगी सर्वोच्च न्यायालयाने अखेर अनेक निर्बंधांसह दिली. परंतु तरीही प्रत्यक्षात मात्र या रथयात्रेला मोठी गर्दी लोटल्याचेच चित्र दिसले. देशातील सध्याची कोरोना संबंधी भयावह परिस्थिती पाहता अशी गर्दी कुठल्याही देवस्थानाच्या परिसरात करणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्रातील वारीच्या परंपरेने सदोदितच काळाच्या ओघात असंख्य नव्या गोष्टींना स्वत:मध्ये सामावून घेतले आहे. परमेश्वर चराचरात सामावलेला आहे. आपल्या भोवतीच्या झाडां-पानां-फुलांत इतकेच काय सर्वांभूती तो आहे, हे अनेक संतांनी त्यांच्या अभंगरचनांमधून सांगितले आहे. त्यामुळेच वैश्विक साहित्य ठेवा ठरावा अशा या अभंगरचनांचे श्रवण करुन त्यांच्या माध्यमांतून यंदा आपण विठू माऊलीची आगळी गळा भेट घेऊ शकतो. सध्याच्या कोरोना संकट काळात सभोवतीने मृत्यूचे भय दाटत असताना मंदिरात जाऊन देवाची करुणा भाकून मनाला उभारी येईलही, परंतु देवस्थान म्हटले की गर्दी, अस्वच्छता या गोष्टीही आपल्याकडे अविभाज्य भाग असल्यासारख्या पूर्वापार चालत आल्या आहेत. परंपरेला जपण्यासाठी पुरीच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी गुजरातमधील अहमदाबाद येथील रथयात्रेला मात्र तेथील उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली हेही लक्षात घेतले पाहिजे. पुरीतील रथयात्रेचा पायंडा म्हणून अन्यत्र वापर करता येणार नाही, याची दक्षताही सर्वोच्च न्यायालयाने घेतली. कारण आपण ही परवानगी पुरी येथील रथयात्रेकरीताच देत आहोत हे ही न्यायालयाने स्पष्ट केले. वास्तविक पाहता प्रत्येक मोठे देवस्थान म्हणजे एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच असते. बर्‍याचदा पंचक्रोशीतील अनेकांची उपजीविका ही त्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असू शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या निकषांच्या आधारे कालांतराने काही ठिकाणी निर्बंध शिथिल करावेही लागतील. परंतु सध्या तरी आपले सरकार जनतेच्या आरोग्यालाच प्राधान्य देते आहे. त्यामुळेच कोरोना साथीच्या संदर्भात आवश्यक असलेली सर्व दक्षता जनतेनेही घेतलीच पाहिजे. मास्क वापरणे, गर्दी टाळणे, परस्परांमध्ये योग्य अंतर राखणे, हातांच्या स्वच्छतेबाबतीत दक्ष राहणे आदी गोष्टींचा अवलंब करताना लोकांनी सरकारी आदेशाची वाट पाहू नये.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply