कर्जत : बातमीदार
अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील आसल आदिवासीवाडीमधील भिमीबाई सांबरी यांचे घर खचले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहणे धोकादायक झाले असून शासनाने तत्काळ त्या महिलेला मदत देण्याची मागणी होत आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आसलवाडीमध्ये भिमीबाई सांबरी यांचे कुडामेडीचे घर आहे. मुसळधार पावसामुळे या महिलेचे घर पूर्ण खचले आहे. त्या लहानशा घरात सर्वत्र चिखल झाला असून आदिवासी महिलेला राहण्यासाठी घरात जागा राहिली नाही. आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भिमीबाई सांबरी यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आपल्या परीने पैसे गोळा करून त्या आदिवासी महिलेचे घर उभे करणार आहेत.