Breaking News

नॉन कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करा; नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी

पनवेल ः बातमीदार

पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. प्रशासनाकडून या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज शंभरपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. सर्व रुग्ण पनवेल जिल्हा रुग्णालय, एमजीएम कामोठे येथे उपचार घेत आहेत. कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कोविड चाचणी केल्याशिवाय त्यांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे गरोदर माता, कॅन्सरग्रस्त रुग्ण, किडनीचे विकार असलेले रुग्ण यांची कोविड चाचणी केल्याशिवाय त्यांच्यावर उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे.

त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथे पूर्वाश्रमीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत जर नॉन कोविड रुग्णांकरिता हॉस्पिटल सुरू केले तर अनेक नागरिकांना होणारा त्रास कमी होईल व त्यांना इतर रोगांवरही व्यवस्थितरीत्या उपचार घेणे शक्य होईल, असे मत डॉ. अरुणकुमार भगत यांनी व्यक्त केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना

दिले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply