आपल्या देशात विकसित केल्या जात असलेल्या, भारत बायोटेक निर्मित कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु भारत हा लशींचा व औषधांचा एक मोठा उत्पादक असून कोरोनावरील लशीच्या निर्मितीतही भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जगभरात यापूर्वीच किमान डझनभर लशींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात एखादी लस बाजारात उतरायला वर्षअखेर किंवा मार्च उजाडणार असल्याने आपली लढाई लांब पल्ल्याची आहे हे पुरते स्पष्ट झाले आहे.
भारतात बनवल्या जात असलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचण्यांना केंद्र सरकारकडून या आठवड्याच्या प्रारंभी परवानगी देण्यात आली. हैदराबादस्थित भारत बायोटेक या लस निर्मितीतील मोठ्या कंपनीला आपल्या औषध महानियंत्रकांनी थेट पहिल्या व दुसर्या टप्प्याच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली. यातूनच आपल्याला लसनिर्मितीची गती वाढवायची आहे हे पुरते स्पष्ट होते. भारत बायोटेक खेरीज आणखी किमान पाच भारतीय कंपन्या कोरोनावरील लस निर्मितीच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यांच्या मानवी चाचण्यांना अद्याप अवकाश आहे. जगभरातील प्रयत्नांवर नजर टाकली असता अशा सुमारे दीडशे लशींच्या निर्मितीचे प्रयत्न निरनिराळ्या देशांत सुरु असून यापैकी सतरा लशींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. यापैकी ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या लस निर्मितीची प्रक्रिया सर्वात आघाडीवर असून ही लस पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीयाच्या सहकार्याने तयार केली जात आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या लशींच्या मानवी चाचण्यांचे निकाल अपेक्षित असून ते अनुकूल असल्यास संबंधित कंपनी छोट्या मात्रेमध्ये या लशीच्या वीस ते तीस लाख डोसांची निर्मिती करील असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. दुसर्या व तिसर्या टप्प्यांतील मानवी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो डोसांची निर्मिती केली जाईल. मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात अगदी छोट्या समुदायावर प्रयोग करुन लस घातक तर नाही ना याची खातरजमा केली जाते. याला साधारण महिना-दोन महिने लागू शकतात. दुसर्या टप्यात लस प्रभावी ठरण्यासाठी डोस नेमका कसा व किती असावा याची निश्चिती केली जाते. या दुसर्या टप्प्याला मात्र तब्बल सहा महिने लागू शकतात. आपल्या देशापुरते बोलायचे झाले तर या वर्षअखेरीपर्यंत किमान दोन-चार लशींच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण झालेला असेल. लस हातात आल्यानंतर ती प्राधान्याने कुणाला द्यायची यावर थेट जागतिक आरोग्य संघटनेपासून ते देशादेशांत विचार सुरु आहे. या वर्षअखेरीपर्यंत लशींच्या काही कोटी डोसांची तर 2021 च्या अखेरीपर्यंत दोन अब्ज डोसांची निर्मिती होईल. कोरोनाशी झुंजणारे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी तसेच वय वा अन्य आजारांमुळे कोरोनाचा अधिक धोका संभवणारे यांना लस प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावी असा सूर जगभरातच लागतो आहे. भारताची अफाट लोकसंख्या लक्षात घेता मात्र प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यास काही वर्षे लागतील असे दिसते आहे. लस निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतलेला दिसत असला तरी श्रीमंत विकसित देशांनी लशींच्या आगाऊ खरेदीच्या ऑर्डर्स नोंदवण्यासाठी धाव घेतली आहे. सुरुवातीला तुटपुंजा पुरवठा उपलब्ध होणार असल्याने लस हाती लागण्याच्या रांगेत गरीब, विकसनशील देश मागे पडतील की काय अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. एकूण परिस्थिती पाहता कोरोनाशी सुरु असलेली आपली लढाई अद्यापही लांब पल्ल्याचीच असल्याचे स्पष्ट होते.