नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेल येथील ’कलादर्पण’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारानी आपापल्या घरातूनच ऑनलाइन सादरीकरण करून विठ्ठल भक्तीचा जागर केला.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या शीर्षकाने संपन्न झालेला हा दृक्श्राव्य कलाविष्कार सर्व रसिकाना आनंद देणारा ठरला. अभंगगायन, नृत्य, नाटक, भजन, कीर्तन, वारीचे अनुभवकथन, व पसायदान अशा विविध कलाप्रकारांचा या कार्यक्रमात
समावेश होता. लहान मुलांपासून ते 78 वर्षांच्या आजोबांचा सहभाग हे कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
या कार्यक्रमाची निर्मिती, संहिता, संकलन, निवेदन व भूमिका इ. सर्व निर्माता व प्रसिद्ध लेखक शंकर आपटे यांनी केले. आनंद गुडी यानी कलासहाय्य केले. पद्मनाभ व मुग्धा भागवत, प्राची देशपांडे यांनी तंत्रसहाय्य केले. प्रतिभा कुलकर्णी यानी संवादिनी व माधव भागवत यानी तबलासाथ केली.
कोरोनामुळे पंढरीची वारी होऊ शकली नाही. यामुळे थोडी निराशा झाली. पण भक्तमंडळीनी निराश न होता या आठवणीनिमित्त एकतरी झाड आपल्या परिसरात लावावे असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भाविकाना केले आहे.
– नृपाली जोशी, सचिव, कलादर्पण