माणगाव ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून माणगाव तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने जनतेबरोबरच प्रशासनही हतबल झाले आहे. माणगाव तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत चार, मोर्बा गावात चार, इंदापूर गावात तीन, तर मुठवली, साई आणि कशेणे गावात प्रत्येकी एक असे एकूण 14 कोरोनाबाधित आढळले असून त्यांचा कोरोना अहवाल बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्याचे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी सांगितले.
माणगाव तालुक्यातील आतापर्यंत 35 गावांतून 155 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 87 रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला असून सध्या तालुक्यात एकूण 66 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तालुक्यातील माणगाव, मोर्बा, इंदापूर गावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
कोरोनाच्या संकट काळात जनतेने गर्दी करू नये. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये. वेळोवेळी आपले हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. हाताला वारंवार सॅनिटायझर लावावे. सुरक्षित अंतर ठेवावे, अशा सूचना करण्यात येत असून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. तरच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यात यशस्वी होऊ, असे आवाहन तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी करून सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.