पाली ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा चढता आलेख पाहता कोरोनाची मगरमिठी दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजार 107 झाल्याने जिल्ह्याची धडधड वाढली आहे. अशातच कोरोनाचे रुग्ण आढळलेली क्षेत्र कोरोनाबाधित घोषित केल्याने नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणीअंती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार पार झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारपर्यंत 179 नागरिकांचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सर्वत्र कोरोनाची दहशत व चिंता कमालीची वाढत आहे. साधा सर्दी-खोकला झाला तरी अनेकांची घाबरगुंडी उडत आहे. काहींनी घरच्या घरी उपचारांवर, तर अनेकांनी घरगुती काढा घेण्यावर भर दिला आहे. दिलासादायक बाब म्हणजे स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार 498 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बुधवारपर्यंत पनवेल मनपा 1163, पनवेल ग्रामीण 357, उरण 134, खालापूर 158, कर्जत 69, पेण 141, अलिबाग 134, मुरूड 24, माणगाव 52, तळा दोन, रोहा 93, सुधागड एक, श्रीवर्धन 36, म्हसळा 22, महाड 42, पोलादपूर दोन असे एकूण दोन हजार 430 सक्रिय रुग्ण आहेत.
कोविडने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नांनंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बरे झालेल्यांची संख्या पनवेल मनपा 1914, पनवेल ग्रामीण 618, उरण 247, खालापूर 29, कर्जत 120, पेण 97, अलिबाग 107, मुरूड 22, माणगाव 87, तळा 14, रोहा 116, सुधागड सहा, श्रीवर्धन 19, म्हसळा 32, महाड 39, पोलादपूर 31 अशी एकूण तीन हजार 498 इतकी आहे. बुधवारपर्यंत पनवेल मनपा 88, पनवेल ग्रामीण 22, उरण, खालापूर प्रत्येकी नऊ, कर्जत सात, पेण, अलिबाग प्रत्येकी आठ, मुरूड पाच, माणगाव, तळा, रोहा प्रत्येकी दोन, श्रीवर्धन तीन, म्हसळा चार, महाड आठ, पोलादपूर दोन असे एकूण 179 नागरिक मृत पावले आहेत. त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते कोरोनाविरोधातील लढाईत दुर्दैवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेली गावे, शहरे, सोसायट्या कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. घरातच राहून शासकीय नियमांचे पालन करावे. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.