Breaking News

खोपोलीत शाळेची घंटा वाजलीच नाही

संस्थाचालक संभ्रमावस्थेत

खोपोली : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार म्हणून संस्थाचालक  तयारीत असताना, अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सोमवारी खोपोली व परिसरातील शाळांचे दरवाजे उघडले नाहीत व शाळेची घंटा वाजलीच नाही. मात्र राज्य शासनाच्या या घाईगडबडीच्या निर्णयाने पालकवर्गात नाराजी पसरली.

राज्य शासनाने घाईगडबडी 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार खोपोली व खालापूर तालुक्यातील शाळा सुरू करण्याबाबत संस्थांनी पूर्ण तयारी केली होती. शाळेतील सर्व वर्ग सॅनिटायझर करण्यात आले होते, मात्र शिक्षकांची तपासणी झाल्यानंतर व पालकाकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास विषयीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच शाळेत तपासणी मशीनची व्यवस्था करणे इत्यादी बाबीबद्दल संस्थाचालकांत संभ्रमावस्था दिसून येत आहे. शिक्षकाची तपासणी झाल्यानंतर शिक्षकापासून विद्यार्थ्यांना संसर्ग रोग होणार नाही, याची खात्री काय? अशी विचारणा पालकवर्गातून होत आहे.

सध्या प्रवासाची साधने अपुरी म्हणजे लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही, एसटी बस, रिक्षामध्ये मर्यादित प्रवासी यामुळे खेड्यापाड्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, अशी खंत खालापूर तालुका शिक्षण मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे. सोशल डिस्टन्सिंचे पालन करण्यासाठी एका बाकड्यावर एकच विद्यार्थी बसवावा लागणार आहे, त्यामुळे अध्ययन टप्प्याटप्प्यात करावे लागणार तसेच शाळेत न येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अध्ययन करावे लागणार यामुळे शिक्षकांची कसोटी लागणार आहे व त्यामुळे शिक्षकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार आहे.

दरम्यान, खोपोलीतील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणार्‍या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाची घंटा सोमवारी वाजलीच नाही.

अनेक अडचणी

खेड्यापाड्यातील सर्वच विद्यार्थ्यांकडे महागडे मोबाइल किंवा इंटरनेट सेवा असेलच याची खात्री नाही. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, त्यांचाही अभ्यास परीक्षेसाठी कुठून सुरू करावयाचा. आतापर्यंत पालकांकडून आम्हाला ना हरकत पत्रे प्राप्त झाली नाहीत, त्यामुळे पालकांचा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा कल दिसून येत नाही, अशा अनेक अडचणींचा पाढा किशोर पाटील यांनी वाचला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply