कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील पिंपळोली येथे एका व्यक्तीचा ठाणे येथील रुग्णालयात मृत्यू झाला. शरीरातील अन्य व्याधींवर उपचार घेत असलेल्या या व्यक्तीला कोरोना झाला आणि चार दिवसांनी त्याचे रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना खारघर येथील ग्रामविकास भवनात नेण्यात आले असून, त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
पिंपळोली गावातील मृत पावलेल्या 48 वर्षीय व्यक्तीला वेगवेगळ्या व्याधींवर उपचारासाठी नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने टेस्ट केली असता ही व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे कोरोनावर उपचार करण्यासाठी या रुग्णाला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना सोमवारी (दि. 11) त्याचा मृत्यू झाला.
कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मोरे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील पिंपळोली गावात पोहोचले व त्यांनी माहिती घेतली.
दरम्यान, पिंपळोली येथील व्यक्ती कर्जत तालुक्यातील पहिला कोरोना बळी ठरली असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. याआधीचे तिन्ही रुग्ण कोरोनावर मात करून सध्या होम क्वारंटाइन आहेत.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …