Breaking News

खवले मांजराला जीवदान

पाली ः प्रतिनिधी

विळे गावाच्या हद्दीत काही तरुणांना रस्त्याच्या कडेला सापडलेल्या खवले मांजराला  वनविभाग, शिक्षक व तरुणांच्या साहाय्याने तपासणी करून जंगलात सुखरूप सोडून जीवदान देण्यात आले. विळे गावाजवळील पेट्रोलपंपाच्या रस्त्याशेजारी एक खवले मांजर काही तरुणांना दिसले. वाहनांच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असता, कोणी त्याला पकडून तस्करीदेखील केली असती किंवा मारून मांस खाल्ले असते, परंतु प्रसंगावधान दाखवत या तरुणांनी ताबडतोब वन विभागाला याबाबत कळविले. वन विभागानेदेखील तातडीने याची दखल घेत योग्य कार्यवाही केली. यलवडे येथील तरुण हर्षद शिंदे, कल्पेश सोंडकर यांनी खवल्या मांजराला पाहिले व सुखरूप ठेवून वन विभागाला कळविले. त्यानंतर विळे येथील वनरक्षक अमोल निकम, पाटनूस येथील वनपाल शंकर तांडेल, तासगावच्या वनरक्षक वर्षा व्यवहारे ताबडतोब घटनास्थळी पोहचले. स्थानिक निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंढे, संदीप उघडा व सुभाष ओव्हाळदेखील तेथे आले. वन विभाग कर्मचार्‍यांनी खवले मांजराची तपासणी करून सुरक्षित असल्याची खात्री केली. त्यानंतर पंचनामा करून त्याला वन विभागातील आरक्षित जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले. येलवडे, सणसवाडी व विळे येथील तरुण, वन विभागातील कर्मचारी व शिक्षकांमुळे खवले मांजराला जीवदान मिळाले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply