लेखन सराव खंडित झाल्यामुळे अर्धा तास अधिक
गव्हाण ः वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेज, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायाण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षांना मंगळवारी (दि.15) प्रारंभ झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांत बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाइन तर काही ऑफलाइन शिक्षणानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये कुतूहल व अनामिक धाकधूक अशा संमिश्र भावनांमध्ये या परीक्षा पार पडत आहेत. विद्यार्थ्यांचा लेखन सराव खंडित झाल्यामुळे अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच दोन्ही परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची माहिती घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित परीक्षा केंद्र असल्याची पाहणी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयशेठ घरत, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या व केंद्रप्रमुख साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक व ब्लॉक कंडक्टर प्रमोद कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर, समन्वय समिती सदस्य व स्टेशनरी इन्चार्ज रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव,पर्यवेक्षक दीपक भर्णुके, जुनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. मंडळाने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्यात आला.