Breaking News

‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती!

कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे अर्थचक्र तुलनेने लवकर सुरु होऊ शकेल, अशी सर्व चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जीवनपद्धतीचे पालन, एक देश आणि समाजाने याकाळात दाखविलेले सामंजस्य, शेतीमुळे ग्रामीण भागात व्यवहारांना आलेली गती आणि सरकारी व्यवस्थेने केलेले व्यापक प्रयत्न, यामुळे हे शक्य होते आहे.

कोरोना साथीमुळे जगाचे व्यवहार एक दोन महिने एकाचवेळी थांबले आणि अजूनही ते पूर्णपणे सुरु होऊ शकलेले नाहीत.अशी वेळ जगावर कधी आली नव्हती. त्यामुळे भारतासह सर्व जग सध्या भविष्याविषयीची अनिश्चितता अनुभवत आहे. कोरोना विषाणू माणसाला जो उपद्रव देतो आहे, त्याविषयी गेले सहा महिने जगात संभ्रम आहे आणि तो कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. त्याचेकारण जगात या विषाणूचा जो वावर आहे, त्याविषयी आजचे अत्याधुनिक जग आजही खात्रीशीर काही सांगू शकत नाही. अशा सर्व नकारांत भारतात काय चालले आहे, हे पाहिल्यास गेले सहा महिने भारतीय समाजाने या संकटाचा सामना मोठ्या धीराने केला आहे, असे म्हणावे लागेल. लॉकडाऊन काही प्रमाणात सैल होत असताना कोरोनाचे पेशंट वाढत चालले असले तरी त्या वाढीचा आणि मृतांचा वेग इतर देशांपेक्षा कमी ठेवणे आतापर्यंत शक्य झाले आहे. 126 कोटी लोकसंख्या, दारिद्रयामुळे शहरात असलेल्या दाट वस्त्या आणि व्यवहार बंद असल्याने निर्माण झालेले बेरोजगारी तसेच उदरनिर्वाहाचे प्रश्न.. अशी कठीण आव्हाने असताना भारतीय समाज (काही किरकोळ अपवाद वगळता) समंजसपणे प्रवास करताना दिसतो आहे. त्याचाच परिणाम म्हणजे भारतातील अर्थचक्र तुलनेने लवकर फिरू लागेल, अशी निर्माण झालेली आशा होय.

अर्थचक्रकसे फिरते आहे, याचे जे निकष आहेत, त्यातील एक प्रमुख म्हणजे शेअर बाजार. भारतीय शेअर बाजाराने गेल्या तीन महिन्यात तब्बल 35 टक्के परतावा दिला आहे. शेअर बाजाराने इतका घसघशीत परतावा द्यावा, असे खरे म्हणजे काही घडलेले नाही. अर्थात, शेअर बाजाराने इतकी आपटी खावी, असे मार्च मध्ये काही घडले नव्हते, तसेच तो इतका वर जावा, असेही काही जूनमध्ये घडलेले नाही, असे फारतर समजू यात. पण त्याच्या पुढे जावून विचार करावयाचा तर भारतातील अर्थचक्र लवकर वेग घेईल, असा विश्वास शेअर बाजाराला आणि या क्षेत्रातील लोकांना वाटतो आहे, हेही तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय काही आकडेवारी असे सांगते की कोरोनाच्या भीतीवर मात करून आणि काळजी घेऊन भारतातील अनेक व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे हा विश्वास उगाचच निर्माण झाला, असेही म्हणता येणार नाही.

शेती क्षेत्राकडून वाढीव अपेक्षा

भारताला याकाळात निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे. जूनमध्ये एवढा चांगला पाऊस पडला, असे गेल्या दहा बारा वर्षांत पाहायला मिळाले नव्हते. त्यात भर म्हणजे सरकारने शेतीसाठी मोठी तरतूद केली असल्याने शेतीवर खर्च करण्यासाठी भांडवल उपलब्ध झाले आहे. या दोन्हीही गोष्टी जुळून आल्याने शेती क्षेत्राकडून असलेल्या अपेक्षा यावर्षी वाढल्या आहेत. ग्रामीण भाग म्हणजे भारत आणि शहरी भाग म्हणजे इंडिया, असे काही वेळा म्हटले जाते. त्या भाषेत बोलायचे तर कोरोनानंतरचे अर्थचक्र सुरु होण्यास पुढील काळात भारतातील व्यवहार लाभदायी ठरणार आहेत. 2019 मध्ये खरीपाची पेरणी 15.5 दशलक्ष झाली होती, ती यावर्षी 20.31 दशलक्ष हेक्टर झाली आहे. गेल्यावर्षी दरदिवशी सरासरी 2165 ट्रॅक्टर विकले गेले, ती सरासरी यावर्षी जूनमध्ये अशा कठीण स्थितीतही दरदिवशी 1126 इतकी झाली आहे. खताचा वापर 2.1 दशलक्ष टनावरून 4 दशलक्षटनांवर गेला आहे. भारतीय शहरांतील व्यवहार बंद असताना शेतीची काही कामे सुरु होती आणि त्याला पावसाने चांगलीच गती दिली आहे. अन्नसुरक्षेचा विचार करता इतर सर्व गोष्टींपेक्षा भारतासाठी अन्नधान्य उत्पादनाला अतिशय महत्व आहे. ते यामुळे शक्य होणार असल्याने भारताचे अर्थचक्र लवकर सुरु होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. सरकारने गरजू 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविणार असल्याचे आणि इतरही सवलती देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेवर सरकारचे 1.49 कोटी रुपये खर्च होणार आहेत. एकेकाळी धान्याची आयात करणारा देश संकटाच्या काळात अशी क्षमता ठेवून आहे, या दृष्टीने या आकडेवारीकडे पाहिले की भारताच्या अर्थचक्राविषयीचा विश्वास कोठून येतो, हे वेगळे सांगण्याची गरज पडत नाही.

सर्वच आकडेवारी आशावादी

भारताचे अर्थचक्र कसे सुरु झाले आहे, याचे काही इतर निकष पाहिले की त्याची आणखी प्रचीती येते. पेट्रोल आणि डिझेलचा वापर एप्रिलमध्ये 60 टक्के कमी झाला होता, ती तूट आता 18 टक्क्यांवर आली आहे. विजेचा वापर 70 टक्केच होत होता, तो आता 92 टक्क्यावर आला आहे. टोल नाक्यांवरील कलेक्शन केवळ 8 टक्के होत होते, ते आता 50 टक्के होऊ लागले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये 4 कोटी ईवे बिले निघाली, ती संख्या गेल्या जूनमध्ये 5 कोटी झाली आहे. त्यामुळेच जीएसटीची जमा जूनमध्ये 90 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. औद्योगिक उत्पादन अर्थचक्रात अतिशय महत्वाचे ठरते. त्या उत्पादनासंबंधी पीएमआय इंडेक्स जाहीर केला जातो, तो एप्रिलमध्ये 27 पर्यंत खाली गेला होता, तो जूनमध्ये 50 टक्के झाला आहे. बेरोजगारीचे आकडे सध्याच्या गणनेच्या पद्धतीने एप्रिलमध्ये 29.22 इतके खाली गेले होते, ते जूनमध्ये 7.26 टक्के झाले आहेत. असंघटित क्षेत्र अधिक असलेल्या आपल्या देशात ही आकडेवारी काढण्याला खूपच मर्यादा आहेत, हे मान्य केले तरी सारख्याच निकषांनी प्रसिद्ध झालेलीही आकडेवारी देशाचे अर्थचक्र फिरू लागले आहे, असा विश्वास देते.

काळ्या ढगांना सोनेरी किनार

परकीय चलनाच्या साठ्यात भारताने याच काळात मारलेली 500 अब्ज डॉलरवरची म्हणजे जगात पाचव्या क्रमांकाची झेप, त्यामुळे रुपयाला मिळालेले स्थर्य, रिलायन्ससह इतर काही कंपन्यानी याच काळात मिळविलेली परकीय गुंतवणूक, इंधनाचे कमी झालेले दर आणि त्यामुळे आयात निर्यात व्यापारातील तूट कमी होण्यास झालेली मदत, शेअर बाजारात परतून आलेले परकीय गुंतवणूकदार आणि त्यांनी सुरु केलेली गुंतवणूक, सरकारने जाहीर केलेले 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज, बँकेतील ठेवी आणि पतपुरवठ्यात होत असलेली वाढ, सरकारने शेती आणि इतर क्षेत्राच्या वाढीसाठी जाहीर केलेले आत्मनिर्भर सारखे धोरणात्मक निर्णय – अशा सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे कोरोनासारख्या काळ्या ढगांना आलेली सोनेरी किनार होय.

क्षमता वाढत आहेत, हे महत्वाचे

कोरोनाचे संकट जागतिक असल्याने जगाच्या अर्थकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे त्याचा फटका भारताला काही प्रमाणात बसणारच आहे. पण आत्मनिर्भरसारख्या धोरणांच्या मार्गाने त्याचा फायदाही भारताला मिळू शकतो, अशा काही शक्यताही निर्माण होत आहेत. विशेषतः चीनविषयी जगात जी मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे, तिचा फायदा भारताला मिळू शकतो. तो सर्व फायदा भारत घेऊ शकतो काय, याची चर्चा सध्या आर्थिक विश्वात सुरु आहे. त्याविषयी अनेक शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. पण या स्थितीचा सर्व फायदा आपल्याच देशाला मिळेल, अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या क्षमता वाढवत राहणे, हे तर आपण निश्चित करू शकतो. देशातील सध्याच्या सर्व विसंगती मान्य करूनही, त्याक्षमता वाढविण्याबाबतीत एक देश आणि समाज म्हणून आपण मार्गक्रमण करत आहोत, हे या अभूतपूर्व संकटात अधिक महत्वाचे आणि म्हणूनच आशादायी आहे.

आकडे बोलतात

–              7927 कोटी रुपये -जून महिन्यात भारतीय गुंतवणूकदार एसआयपीच्या मार्गाने म्युच्युअल फंडात करत असलेली गुंतवणूक (मार्च 2020 पेक्षा 700 कोटी रुपयेकमी)

–              6 लाख 11 हजार कोटी रुपये -एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य. सर्वाधिक बाजारमूल्य असलेली भारतीय बँक

–              16हजार 400 कोटी रुपये -भारतीय शेअर बाजारातील सर्वात श्रीमंत वैयक्तिक गुंतवणूकदार‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला (वय60) यांची संपत्ती

–              65,000 रुपये -एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत. भारतीय शेअर बाजारातील सर्वात जास्त किंमतीचा शेअर.

म्युच्युअल फंडांची अधिक पसंती असलेल्या

आणि चांगल्या मानल्या जाणार्‍या कंपन्या

–              स्टेट बँक

–              भारती इअरटेल

–              पॉवरग्रीड

–              वेदांता

–              एनटीपीसी

–              आयसीआयसीआय बँक

–              सिप्ला

–              इंजिनिअर्स इंडिया

यमाजी मालकर , ymalkargmail.com

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply