
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. परिणामस्वरुपी, कोरोनाच्या फैलावाला काही प्रमाणात अटकाव होऊन प्रादुर्भावाचा वेग कमी ठेवण्यात यंत्रणेला यश आले. अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे खरी. पण कोरोनाची भीती कायम असल्याने अनलॉकची ही वाटचाल अडखळतच सुरू आहे.
एकीकडे देशातले, राज्यातले कोरोनाबाधितांचे आकडे वाढतच आहेत. मृतांची संख्याही. बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या एकीकडे दिलासा देते, तर जवळपास वा परिचितांमध्ये कुणाला कोरोनाची बाधा झाल्याची खबर मिळताच छाती पुन्हा दडपून जाते. शहरातील महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कोरोनापूर्व काळात नकोशी वाटायची. आता अनलॉकच्या सुरूवातीच्या काळात मात्र वाहतुकीच्या कोंडीची दृश्ये सकारात्मक भावना जागवतात. पुन्हा सारे काही ठीक होईल, जीवन पूर्ववत होईल अशी आशा मनात जागी होते. सगळ्यांना सध्या त्या एकाच गोष्टीची आस आहे, जगणे पूर्ववत, नॉर्मल होण्याची. पण वास्तवाची जाणीव पाठ सोडत नाही. अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने काय सुरू होणार, काय बंद राहणार याची सरकारी परिपत्रके राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निघाली आहेत. राज्यात त्यात सतत बदलही होत आहेत हा भाग अलाहिदा. या प्रकारांमुळे लोकांमध्ये, व्यावसायिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कुठली दुकाने उघडली आहेत, ती किती वेळ उघडी राहणार आहेत, बंद कुठल्या वेळेत असणार याबद्दल बराच संभ्रम आहे. खाजगी कार्यालयांमध्ये दहा टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु लोकांनी कार्यालयात पोहोचायचे कसे याचा विचार पुरता झालेला दिसत नाही. बसगाड्यांची पुरेशी व्यवस्था न केल्याने मुंबई महानगर प्रदेशात लोकांचा बसेसची वाट पाहण्यातच बराच वेळ जातो आहे. काही प्रमाणात लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत काटेकोर आहेत. परंतु गाड्यांना विलंब लागल्यास, गर्दी वाढल्यास मात्र लोकांना कोरोनासंबंधित खबरदारीचा विसर पडतो आणि ते स्वाभाविक आहे. त्यामुळे लोकांना कामासाठी घराबाहेर पडण्यास मुभा देण्याआधी त्यांच्या प्रवासाच्या सुविधांचा विचार व्हायला हवा. परंतु अनुभवशून्यतेतून अवघीच वाटचाल पडत-धडपडत, अडखळत सुरू असल्याचे चित्र दिसते आहे. लोकल रेल्वेचा आजवर कायमच मुंबईची लाइफलाइन म्हणून उल्लेख झालेला आहे. उपनगरीय रेल्वेसेवेशिवाय कामकाजासाठी बाहेर पडणे हे अनेकांसाठी मोठ्या दिव्यासारखेच ठरते आहे. तीन-साडेतीन तास खर्च करून नोकरीचे ठिकाण गाठणे आणि पुन्हा परतीसाठी तेवढाच वेळ घालवणे हे अनेकांकरिता जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी डोके वर काढते आहे. परंतु यासंदर्भातील निर्णय अत्यंत दक्षतापूर्वकच घ्यावा लागणार आहे. मंगळवारी राज्यात 2259 नव्या कोरोनारुग्णांची तर 120 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 90 हजार 787 झाली आहे. आजच्या घडीला राज्यात 44 हजार 849 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. त्यात रोज नव्या रुग्णांची भर पडतेच आहे. अर्थातच बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची नोंदही घ्यावीच लागेल. आजपर्यंत 42 हजार 638 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या आकड्यांवर नजर ठेवूनच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करावे लागतील. सुयोग्य दक्षता न बाळगल्यास अनलॉकच्या दिशेने टाकलेली पावले आपल्यावरच उलटतील हे लक्षात ठेवलेले बरे.