मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी
मुरुड तालुक्यामधील काशीद समुद्र किनारी शुक्रवारी (दि. 20) सकाळीच पुणे येथील काही युवक पुण्याहून पर्यटनासाठी काशिद-बिचवर आले होते. या वेळी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले चार जण पोहता पोहता खोल समुद्रात खेचले गेले व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. तेथे उपस्थित जीवरक्षकांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. चार युवकांना बुडत असताना वाचविण्यात रोहन खोपकर, वॉटर स्पोर्टस व एडव्ह्चर्सचे लाईफगार्ड भावेश भोईर व संजय वाघमारे यांना मोठे यश प्राप्त झाले आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड टीटीएस या नामांकित कंपनीतील इंजिनियर्स असलेले सत्यम कुमार (21), सुमित बोरकर (20),अनिरुद्ध गायकवाड(20) नीरज कुमार (24), पिरिसिल्ला गुप्ता (21) व स्वाती लोणकर (19) पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशिद बिचवर आले होते. या वेळी सत्यम कुमार, सुमित बोरकर, अनिरुद्ध गायकवाड व नीरज कुमार यांना समुद्रात पोहण्याचा मोह अनावर झाल्याने समुद्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यांचे ओरडणे ऐकून लगेचच रोहन खोपकर वॉटर स्पोर्टस व एडव्हंचर्सचे लाईफगार्ड यांनी स्पीड बोटीच्या सहाय्याने चार युवकांचे प्राण वाचविले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या वेळी काशिदचे रहिवासी व भाजयुमो मुरूड तालुका अध्यक्ष रोहन खोपकर यांनी त्यांना धीर देत, पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.