पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहे. पनवेलमध्ये व्यापार्यांसह नागरिकांनी लॉकडाऊनचे कडक पालन केले आहे. जागो जागो शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तसेच एकीकडे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर महापालिका लक्ष ठेऊन आहे. तर दुसरीकडे विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा उगारुन कारवाई केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. परिणामी कोरोनाग्रस्तांच्या संख्येने झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊन घोषित केले. याचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. पनवेलमध्ये या लॉकडाऊनचे नागरिकांनी कडक पालन केले आहे.
कोरोनाचा विषाणू हा कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुणीही सांगु शकणार नाही अशी सत्य व गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख पाहता आता नागरीकांमध्येही कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे.