नागोठणे ः प्रतिनिधी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणार्या शिरवली गावात असणार्या एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली.
1 जूनदरम्यान ही व्यक्ती मुंबईहून शिरवलीत आली होती. त्यानंतर चार दिवसांनंतर त्रास जाणवू लागल्याने तपासणीसाठी ही व्यक्ती रोहे येथील एका खासगी रुग्णालयात गेली होती. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने पुढील उपचारासाठी रोह्यातील शासकीय रुग्णालयात पाठविले होते. या रुग्णालयातून पुढील तपासणीसाठी या व्यक्तीला पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई, पुणे आदींसह विविध ठिकाणांवरून रायगड जिल्ह्यात येणार्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा इतर ठिकाणांवरून आलेल्या नागरिकांना अलगीकरणात ठेवावे, अशी मागणी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील विविध गावांतील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.