Breaking News

राजस्थानही मध्य प्रदेशच्या वाटेवर? पायलट-गेहलोत कलह शिगेला

जयपूर, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमावलेल्या काँग्रेससाठी आता राजस्थान चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री  सचिन पायलट यांच्यात कलह निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री गेहलोत जयपूरमध्ये आपले सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री पायलट दिल्लीत पोहचले आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी कॅबिनेटची बैठक घेतली, मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री पायलट उपस्थित नव्हते. ते दिल्लीत गेले आहेत. राजस्थानचे जवळपास 10 आमदार दिल्लीत आहेत. हे आमदार काँग्रेसच्या प्रमुखांना भेटून आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत. जयपूरमध्ये काँग्रेस आमदार जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली, पण हे आमदार उपमुख्यमंत्री पायलट यांच्यासोबत आहेत, असे त्यांनी म्हटले नाही.

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. 2018मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर गेहलोत आणि पायलट हे दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते, पण पक्षाच्या प्रमुखांनी गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर पायलट यांना उपमुख्यमंत्री केले. गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद कमी करण्यासाठी तसेच पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्षदेखील बनवण्यात आले, पण उभय नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे. घोडेबाजाराच्या आरोपानंतर आलेल्या नोटिसीने त्यात आणखी भर पडली आहे. नाराज पायलट सध्या कोणत्याही काँग्रेस नेत्याचा फोन उचलत नाहीत.

मध्य प्रदेशातही कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राजस्थानातही मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होते की काय, याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सध्याचा वाद काँग्रेसच्या मोठ्या समस्येचा भाग

राजस्थानमध्ये सुरू झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माहितीवरून एका वृत्तसमूहाने विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात अहंकारामुळे वाद होत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड अविश्वास आहे. सध्याचा वाद काँग्रेसच्या मोठ्या समस्येचा भाग आहे, ज्यात पक्षातील युवा नेतृत्वाला आपल्या भविष्याविषयी चिंता सतावू लागली आहे, तर दुसरीकडे पक्ष राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply