मुंबई : प्रतिनिधी
विरोधक हे सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचे आणि रडल्याचे नाटक करायचे अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करीत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरू आहेत. कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी रविवारी
(दि. 12) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, राज्यात खूप चिंताजनक अशी परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस वाढत आहेत. त्यासोबत मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. आतापर्यंत देशात जेवढे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत, त्याच्या 46 टक्के एवढे मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात ’अनरजिस्टर डेथ’ आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
आज मुंबईमध्ये असंख्य जण कोरोना पॉझिटिव्ह असून, घरात मृत्यू झालेल्या 600 लोकांच्या मृत्यूची नोंद शासनाने अपलोड केलेली नाही. यासोबत 10 एप्रिलला मुंबई महापालिकेने 287 कोरोनाग्रस्त अन्य रकान्यात दाखवलेले आहेत. ते अन्य रकान्यात जाऊ शकत नाहीत. कारण ‘आयसीएमआर’च्या नियमानुसार ते मृत्यू झालेले आहेत. कोरोना असताना जर अपघात झाला तर अपघाती मृत्यू, कोरोना असताना आत्महत्या केली तर आत्महत्येने मृत्यू अशी नोंद होते. नाहीतर त्या सगळ्यांची कोरोना मृत्यूने नोंद करावी लागेल, परंतु 287 मृत्यू जे इतर कारणांनी दाखवण्यात आले आहेत आयसीएमआरच्या नियमानुसार ते कोरोनाचेच मृत्यू आहेत. त्यामुळे आकड्यांची लपवालपवी करूनदेखील इतके मृत्यू वाढत असतील तर खूप काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. शासन जेवढी कोरोनाची लपवाछपवी करणार तेवढा आपण कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवू शकणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत आजही कोरोनाच्या चाचण्या पाच ते साडेपाच हजारांवर जात नाहीत. मुंबईची लोकसंख्या आणि मुंबईत होणारा प्रादुर्भाव याची जर सरासरी पहिली तर 25 ते 30 टक्के वाढत आहे. अशाच जर मुंबईत चाचण्या कमी होत गेल्या तर लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल. शासनाने संख्या लपवण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या कमी केल्या आहेत. ही चुकीची पद्धत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत या देशात जे जे कोरोनाबाधित झाले आहेत, त्यांची प्रकृती सुधारावी, अशी आम्ही प्रार्थना करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
…ही तर मॅच फिक्सिंग
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सध्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये मुलाखत सुरू आहे. यामध्ये पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, डब्ल्यूडब्ल्यूएफची कुस्ती तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी तशी नुरा कुस्ती व्हायची. आता तीच फिक्सिंग सुरू आहे. त्यांची मॅच फिक्सिंग संपू द्या. त्यावर मी योग्य वेळी प्रतिक्रिया देईन.
नया है वह! आदित्य ठाकरेंना टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. या दौर्यावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना सध्या मुख्यमंत्र्यांना जो योग्य वाटतो त्यांना ते मंत्री बनवत आहेत. मंत्री बनवल्याने शहाणपण येतेच असे नाही. ठीक आहे ते नवीन आहेत. बोलत आहेत. बोलू देत. माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये. नया है वह, असा टोला फडणवीस यांनी लगावला.