शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावयाची भीती वाटते, पण ज्यांना शेअर बाजार खुणावतो आहे, त्यांना शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा फायदा घेण्याचे इतर मार्ग कोणते आहेत? त्या काही तुलनेने सुरक्षित मार्गांविषयी…
अनेकांना वाटतं की, आपली कांही गुंतवणूक शेअर बाजारात देखील असावी. परंतु बाजाराबद्दल कुतूहल आणि त्याबद्दल असलेलं अज्ञान यामुळं अनेकांना शेअरबाजारात घाटा होताना दिसतो कारण कुतूहल आपल्याला गप्प बसू देत नाही आणि अज्ञानामुळं अनेक भूलथापांना बळी पडून हक्काचं नुकसान मात्र पदरी येतं. त्यामुळं नवख्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एन्ट्री कशी करावी याबद्दल आज कांही गोष्टी पाहू.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्रामुख्यानं दोन मार्ग आहेत, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. ’प्रत्यक्ष’ या प्रकारात आपण स्वतः गुंतवणूक करू शकतो, ज्यासाठी स्वतःचं खातं लागतं, ज्याला डिमॅट अकाऊंट म्हणतात. बहुतांश कंपन्या डिमॅट खात्याबरोबर ट्रेडिंग खातं देखील उघडून देतात ज्यामध्ये प्रत्यक्ष शेअर्स घेतले अथवा विकले जातात आणि घेतलेले शेअर्स एका दिवसानंतर डीमॅट खात्यात हस्तांतरीत होतात. पुन्हा ते शेअर्स विकण्यासाठी ट्रेडिंग खात्याद्वारे व्यवहार करता येतो. याउलट काही बँका/संस्था केवळ डीमॅट खात्याची सुविधा पुरवतात (उदा. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, जनता बँक, इ.) शक्यतो एकाच ठिकाणी ट्रेडिंग व डीमॅट खाती असल्यास व्यवहार करण्यासाठी हे सोपं पडतं. अशा ट्रेडिंग व डीमॅट खात्यासाठी दरवर्षी 500 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जातं, काही ब्रोकर्स अशा खात्यांसाठी एकदाच 1000 रुपयांची आकारणी करतात आणि आजीवन कोणतेही शुल्क आकारत नाहीत. अनेक बँकाकडं असलेल्या खातेधारकांच्या डेटाबेसवरून मोठ्या बँका आपल्याकडील खातेधारकांचा फायदा घेतात व त्यांना अशा बँकांमध्येच खातं उघडण्यास गळ घालतात किंवा कोणत्यातरी सुमार स्कीम्समध्ये गुंतवणूक करावयास भाग पाडतात आणि काही वर्षानंतर हात चोळत बसायची पाळी येते.
ब्रोकरेज : म्हणजे शेअर खरेदीविक्रीवर लागणारी दलाली. मोठ्या खाजगी व सरकारी बँका भरमसाठ म्हणजे अर्धा टक्का ते एक टक्क्यापर्यंत दलाली लावतात. शक्यतो, अनिवासी भारतीय (एनआरआय) अशा गोष्टींना बळी पडतात कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो. आजकाल ’शून्य ब्रोकरेज’ नावाखाली इतर छुपे चार्जेस लावले जातात परंतु अनेक लोक अशा फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात ओढले जातात. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यवहारामागं 20 रुपये ही दलाली ठीकठाक आहे. जे लोक मोठ्या प्रमाणात व्यवहार म्हणजे दिवसभरात असंख्य व्यवहार करतात त्यांना हे 20 रुपये देखील महाग वाटू शकतात. कारण एका दिवसात जर पन्नास सौदे केले तरी दररोज ब्रोकरेजपोटी 1000 रुपये व्यर्थ खर्च होत असतात. अशांसाठी काही ब्रोकर्स दरमहा केवळ नाममात्र शुल्क घेऊन अमर्यादित व्यवहार करण्यास मोकळीक देतात. त्यामुळं आपण कोणत्या प्रकारात मोडतो, हे ज्याचं त्यानं ठरवावं.
ह्या झाल्या प्रत्यक्ष व्यवहारासंबंधीत काही मूलभूत गोष्टी. आता अप्रत्यक्ष गुंतवणुक म्हणजे काय? तर, या प्रकारात गुंतवणूक जरी शेअर बाजारात होत असली तरी त्यासाठी डीमॅट खातं असलंच पाहिजे अशी सक्ती नसते. असा प्रकार म्हणजे सर्वांच्याच परिचयाचे असलेले म्युच्युअल फंड्स. म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्रितपणे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणं. आता यात देखील अनेक प्रकारच्या योजना असतात. प्रामुख्यानं याचं वर्गीकरण तीन प्रकारात होतं. इक्विटी, डेब्ट व लिक्विड. यापैकी शेअर बाजाराशी निगडीत योजना म्हणजे इक्विटी योजना. आता यात देखील मिश्र योजना असतात ज्यामध्ये इक्विटी मधील गुंतवणूक 50% किंवा जास्त तर उरलेली बहुतांश गुंतवणूक डेब्ट या प्रकारात असते. आता इक्विटी या प्रकारात सुद्धा असंख्य योजना असतात जसे की, लार्ज कॅप योजना म्हणजे याद्वारे होणारी गुंतवणूक ही केवळ मोठ्या कंपन्यांच्याच शेअर्समध्ये म्हणजे एकूण सर्व कंपन्यांपैकी ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन (म्हणजे ट्रेजरीकडं असलेले शेअर्स वगळता जारी केलेले सर्व शेअर्स गुणिले सध्याचा त्या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव) सर्वसाधारणपणे 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल अशा पहिल्या शंभर कंपन्यांमध्येच केली जाते. नंतर मिडकॅप योजना, ज्यामध्ये 5000 ते 20000 हजार कोटी मार्केट कॅपिटलायझेशन असणार्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि स्मॉल कॅप योजना ज्याद्वारे 5000 कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केटकॅप असणार्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. याव्यतिरिक्त क्षेत्रनिहाय गुंतवणूक करणार्या देखील योजना आहेत, जसं की, केवळ बँकांच्या शेअर्समध्ये किंवा औषध कंपन्यांमध्येच गुंतवणूक करणार्या योजना, इ. अजून एक प्रकार म्हणजे ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स) याद्वारे केली जाणारी गुंतवणूक तीन वर्षांसाठी लॉक-इन असते म्हणजे पुढील तीन वर्षं ही गुंतवणूक काढता येत नाही. या प्रकारातील गुंतवणूक ही मिळकत कराच्या 80 सी च्या करबचतीसाठी ग्राह्य धरली जाते. या प्रत्येक योजनेसाठी एक प्रमुख व्यक्ती जबाबदार असतो जो त्या विशिष्ट योजनेद्वारे येणार्या गुंतवणुकीचे नियोजन करत असतो ज्यास फंड मॅनेजर म्हणतात. सर्व म्युच्युअल फंड योजना दरवर्षी एक टक्का शुल्क आकारत असतात ज्यास एक्स्पेन्स रेश्यो म्हटलं जातं ज्याची वजावट तुमच्या एकूण गुंतवणुकीमधून अप्रत्यक्षरीत्या होते. यामध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय असतात ते म्हणजे ठोक एकरकमी गुंतवणूक व दरमहा (रिकरिंग) गुंतवणूक ज्यास सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणतात.
या खेरीज असलेला प्रकार म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस) – या प्रकाराद्वारे केली जाणारी गुंतवणूक देखील थेट शेअर्समध्येच केली जाते परंतु ही गुंतवणूक कमीतकमी 50 लाख रुपये असावी लागते असा नियम आहे. या प्रकारातील गुंतवणुकीसाठी विशेष व्यवस्थापक (फंड मॅनेजर) नेमला जातो जो तुमच्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय घेत असतो. त्यासाठी अशा कंपन्या एक ते दोन टक्के शुल्क आकारत असतात. ही गुंतवणूक देखील तुमच्या नावे उघडल्या जाणार्या खात्यातच केली जाते परंतु खरेदी-विक्रीचे अधिकार त्या कंपनीकडं असतात.
* अजून एक प्रकार म्हणजे एक्सचेन्ज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) –
हे देखील म्युच्युअल फंड्सच असतात परंतु हे शेअर बाजारात व्यवहारासाठी उपलब्ध असतात. यात अनेक प्रकार असतात त्याबद्दल विस्तारानं पुन्हा कधीतरी.
तर अशाप्रकारे शेअरबाजाराबद्दल स्वतःचा अभ्यास व दांडगा अनुभव असल्यास किंवा गुंतवणूक सल्लागाराद्वारे शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणं उचित ठरू शकतं. याउलट परिस्थिती असल्यास म्युच्यअल फंड्स सही हैं।
* रिलायन्स, सोने आणि रोझारी
मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी जरी माशी शिंकली असली तरी एका आठवड्यात सेन्सेक्सनं 1108.76 अंशांची घोडदौड केली तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनं 292 अंशांची तेजी नोंदवली. नीति आयोगानं राष्ट्रीय बँकांमध्ये व विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढवली जावी असा प्रस्ताव सादर केल्यानं बाजारातील तेजी टिकून राहिली. रोझारी बायोटेक या स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या शेअर्सची नोंदणी 669 रुपयांवर झाली, दिवसभरात त्याचा भाव 800 च्या पार गेलेला होता. आयपीओची किंमत केवळ 425 रुपये होती. गेल्या आठवड्यात निफ्टी 50 मधून रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सर्वाधिक वाढला तर एफपीओ संपल्यानंतर येस बँकेचा शेअर जवळजवळ 31 टक्के पडला. आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात अमेरिकेतील रोजगार गमावलेल्यांची आकडेवारी वाढली आणि अमेरिका पुन्हा चीनविरुद्ध पवित्रा घेण्याच्या तयारीनं सोन्याला झळाळी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1901 अमिरिकन डॉलर्स प्रति औन्स झालं तर भारतात (मुंबई) शुक्रवारचे भाव 52750 च्या वर व्यवहार करत होते. पूर्वीच्या माझ्या लेखात तेंव्हाचा भाव 1775 नमूद केलेला होताच. गेल्या लेखात निफ्टीचं उद्दिष्ट 11200 नोंदवलं होतं आणि निफ्टीनं 11239 हा उच्चांक नोंदवून ते पूर्ण देखील केलं. येत्या आठवड्यासाठी निफ्टीसाठी 11350 ही प्रतिकार पातळी तर 11000 ही आधार पातळी विचारात घेता येऊ शकते.
* सुपरशेअर : रिलायन्स रिटेल
अॅपमेझॉन इन्कॉर्पोरेशन हीएक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी ई-कॉमर्स, क्लाउड कंप्यूटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष केंद्रित करते. शेअर्सच्या बाजारभावानुसार वरिष्ठ चार किंवा पाच तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक म्हणून हिचा उल्लेख केला गेला जातो. अशा या कंपनीस भारतीय असणार्या रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलच्या जियो मार्टसाठी मोक्याची भागीदारी हवी आहे. जियो मार्ट ही ई-कॉमर्स कंपनी ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. अॅमेझॉन कंपनीस रिलायन्सच्या रिटेलद्वारे ई-कॉमर्स उपक्रम जिओमार्टनं मे मध्ये सुरू केला आणि अॅमेझॉनच्या स्थानिक युनिट आणि वॉलमार्टच्या फ्लिपकार्टला त्याचे मोठे आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळं त्यासाठी अॅामेझॉन 10 टक्क्यांपर्यंत हिस्सा घेण्यास उत्सुक असल्यास यात आश्चर्य नाही. अशा या बातमीमुळं रिलायन्स रिटेल या अजून शेअर बाजारात नोंदणी न झालेल्या शेअर्सचा भाव 1200 रुपयांपर्यंत वधारला. एक वर्षांपूर्वी याचा भाव 600 रुपये होता. असे शेअर्स सर्वसामान्यांना खरेदी करता येऊ शकतात आणि तसं करण अगदी कायदेशीर आहे. दुसर्या सोप्या शब्दात सांगायचं तर कंपनीचा आयपीओ येण्याआधी केलेलं अॅडव्हान्स बुकिंग. याचा फायदा असा होऊ शकतो की अजून अशी गुंतवणूक रिलायन्स रिटेलमध्ये होत गेल्यास प्राथमिक भागविक्रीसाठी भाव वधारणार यात दुमत नाही. त्यामुळं काळाची पावलं ओळखून आत्ताच गुंतवणूक केल्यास आयपीओच्या किमतीपेक्षा आधी व हमखास शेअर्सप्राप्ति असा दुहेरी फायदा उठवता येऊ शकतो.
-प्रसाद ल भावे. (9822075888)
sharpadvisers@gmail.com