Breaking News

कोरोना सेंटरमधील निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटर्सची चौकशी करा

आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

कोरोना सेंटरमध्ये खरेदी करण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. नाईक यांनी बुधवारी आयुक्त बांगर यांच्या बरोबर कोरोना प्रतिबंध साप्ताहिक आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी रुग्णाच्या जीवाला घोर लावणार्‍या निकृष्ट व्हेंटिलेटरचा आणि अपुर्‍या आयसीयु बेडचा मुद्दा उपस्थित केला.

कोरोना रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे ठरतात. परंतू हे व्हेंटिलेटर योग्यप्रकारे काम करित नसल्याच्या तक्रारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी मोठ्या संख्येने केलेल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निकषानुसार या व्हेंटिलेटरची खरेदी करण्यात आली आहे काय? हि बाब तपासून घ्यावी जर या तक्रारींमध्ये सत्यता आढळली तर दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नाईक यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली असून त्या अनुषंगाने आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे कोविड नियंत्रणाचे काम योग्यता नसलेल्या काही अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहे. या अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणाची समिती नेमून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी या वेळी केली.

नवी मुंबई मध्ये कोरोनाचा आलेख वाढतो आहे, कंन्टेटमेंट झोन मध्ये नियमाचे पालन केले जात नाही हे एक महत्त्वाचे कारण रुग्ण संख्या वाढण्यासाठी समोर आले आहे. त्याकरिता शहरातील सर्व कंन्टेटमेंट झोनमध्ये महापालिका अधिकारी आणि पोलिसांची नेमणूक करावी, अशी सूचना केली. वाशीचे पालिका रुग्णालय कोविड मुक्त करुन इतर आजारांवर उपचारासाठी खुले करावे यासाठी लोकनेते आमदार नाईक अविरत पाठपुरावा करित आहेत. हे रुग्णालय येत्या 10 ते 12 दिवासांमध्ये इतर सर्व आजारांवर उपचारासाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त बांगर यांनी आमदार नाईक यांना दिली.

पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर लोकनेते आमदार नाईक यांनी तुर्भे येथील राधा स्वामी सत्संग केंद्रातील बांधण्यात येत असलेल्या पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरला आणि एपीएमसी येथील निर्यात भवन मधील क्वारंटाइन सेंटरला भेट दिली या सेंटर मधील सर्व सुविधा प्रथम दर्शनी योग्य वाटत असल्या तरी जेव्हा रुग्णांना त्यांची गरज असते तेव्हा या सुविधा तातडीने उपलब्ध करायला हव्यात असे ते म्हणाले.

पालिका प्रशासनातील काही अधिकार्‍यांची कोरोना नियंत्रणाचे काम करण्याची मानसिकता दिसत नाही. अशा अधिकार्‍यांमुळे संपूर्ण यंत्रणा दोषी ठरते. अशा घटकांना बाजूला सारुन कार्यक्षम अधिकार्‍यांची नेमणूक करावी. जोपर्यंत नवी मुंबईतील कोरोनाचा आकडा शुन्यावर येत नाही तोपर्यंत पालिका प्रशासनाकडे उपाययोजनांसाठी पाठपुरावा सुरुच राहील.

-आमदार गणेश नाईक

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply