Breaking News

महिलांनी स्वावलंबी बनावे -महापौर

प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षण यशस्वी

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षणाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (31 ऑगस्ट) येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आज राजकारणाबरोबर सर्वच क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. प्रज्वला योजनेमुळे महिला बचत गटासाठी एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाने पंतप्रधान आवास योजना, सुरक्षित मातृत्व योजना, उजाला योजना, मुद्रा योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लाभ घ्यावा. महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या, प्रज्वला योजनेंतर्गत महिलांना व्यवसाय उभा करणे, महिलांविषयी कायदे याची माहिती व्हावी, यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महिलांचा मानसन्मान वाढला असून महिलांच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत आहे. महिलांनी कोणताही व्यवसाय स्वतः निवडावा व त्यात सचोटीने प्रगती करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, प्रज्वला योजनेंतर्गत बचत गटातील महिलांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन व पनवेल महापालिका महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवित आहे, त्याचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे, असे सांगितले. उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी सांगितले की, प्रज्वला योजनेंतर्गत महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी महिला आयोगातर्फे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. महिलांनी उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी पुढे यावे, यासाठी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करील. पोस्टाच्याही अनेक योजना उपलब्ध असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा. ज्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी अडचणी येत असतील त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे सांगून महिलांनी या प्रशिक्षणात मोठा सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. उपायुक्त संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात प्रज्वला प्रशिक्षणाची, तसेच पनवेल महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी आभार मानले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, उद्योजिका, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मीनल मोहाडीकर, नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, मुग्धा लोंढे, प्रज्योती म्हात्रे, चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या कल्पना राऊत, नगरसेवक, नगरसेविका, उपायुक्त जमीर लेंगरेकर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply