Breaking News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर ’भारतरत्न’ने सन्मान करावा; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती दिलेले समर्पित योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, साहित्य आणि समाजकारण यामध्ये आदरणीय अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाचे वास्तव, त्यांच्या व्यथा, वेदना अजरामर साहित्यातून परिणामकारक पद्धतीने जगासमोर मांडल्या. श्रमिकांसाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याची दखल थेट रशियाने घेतली. महाराष्ट्राच्या मातीत एका मागास कुटुंबात जन्मलेल्या या महानायकाचा मॉस्कोमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे. अण्णाभाऊंनी निरक्षर असतानाही साहित्या माध्यमातून समाजातील दीन, दुर्बल, पीडित श्रमिक लोकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्तीसंग्रामात त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून लोकजागृतीचे काम केले. त्यांनी मराठी भाषेत लिहिलेल्या 35 कादंबर्‍यांचे विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे तसेच सात कादंबर्‍यांच्या आधारावर चित्रपटांची निर्मितीही झाली आहे. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यांनंतरच्या काळात राज्यातील विविध राजकीय व सामाजिक प्रश्नांसंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि यानिमित्त महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या सहयोगातून टपाल तिकीट सुरू केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाजप्रती असलेले महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या समर्पित जीवनाचा गौरव करावा, अशी महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मान करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply