भाजप पदाधिकार्यांचे निवेदन
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक पोलिसांची भेट घेत निवेदन दिले आहे.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सकाळ संध्याकाळी नोकरीधंद्यासाठी जाण्या येण्याच्या मुळातच नव्हे तर संपूर्ण दिवसभर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खारघरसारख्या सुनियोजित शहरामध्ये असे होणे अपेक्षित नाही.
शहरातील वाहतूक कोंडीबाबत तक्रारी घेऊन नागरिक भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात येत असतात.नागरिकांची नेहमीच प्रमुख तक्रार असते की कुठेतरी आडबाजूचे दबा धरून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना अडवून चलन केल जाते. शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेटची सक्ती योग्य नाही,असे रहिवाश्याचे म्हणणे असते. अनेक ज्येष्ठ नागरिकांची तक्रार अशी आहे की त्यांनाही हा त्रास सहन करावा लागतो, असे दृश्य काही विशिष्ट नाक्यांवर दैनंदिन झाले आहे.
या बाबतीत खारघर वाहतूक पोलिसांमार्फत ठोस कार्यवाही व्हावी व वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा शहर मंडळाचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी पोलीस उपायुक्त वहातुक शाखा नवी मुंबई पुरुषोत्तम कराड यांना निवेदन दिले तसेच या तक्रारीचे निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा खारघर शहर योगेश गावडे यांनाही भेटून देण्यात आले. योगेश गावडे यांनी ही मान्य केले की, आपण नमूद केलेल्या ठिकसणी वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूककोंडी होत आहे व वाहतूक वाहती ठेवणे हे वाहतूक पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. पुढील दिवसांमध्ये योग्य त्या सूचना पोलीस कर्मचार्यांना देऊन वाहतूककोंडी होणार नाही व नागरिकांचा त्रास कसा कमी होईल याची आम्ही काळजी घेऊ,असे आश्वासन दिले. तसेच नागरिकांनीही पोलीस दलास योग्य नियमांचे पालन करीत सहकार्य करावे. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीस कारणीभूत होतील अशा पध्दतीने वाहने रस्त्यात उभी करू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या संदर्भात काही विशिष्ट ठिकाणी जेथे वाहतूककोंडी जास्त प्रमाणात होते तेथे सुचना फलक लावावेत तसेच वाहतूक पोलीस नियुक्त करावेत, अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. या वेळी खारघर तळोजा शहर मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे व अशोक जहांगीर उपस्थित होते.