मृत्यूदर कमी करण्यासाठी नवी मुंबई पालिकेची उपाययोजना
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत आजमितीस 431 मृत्यू झाले आहेत. तर एकूण 16 हजारांच्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी नवी मुंबईचा मृत्युदर 2.67 असून तो कमी होताना दिसत नाही. पालिकेकडून आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेड वाढवण्याचे काम वेगात सुरू असले आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अंगावर काढण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे देखील मृत्यू होत असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील सर्व खासगी दवाखान्यांना नियमावली आखून दिली असून यापूढे सर्वच दवाखान्यांना तपासणीसाठी येणार्या रुग्णांची माहिती पालिकेला पुरवावी लागणार आहे.
सध्या मृत्युदर 2.67 टक्के असला तरी नागरिक अद्यापही गंभीर्याने या आजाराकडे पाहत नसल्याचे दिसून येत आहे. कोविडची लक्षणे असलेले सर्दी, ताप, खोकला, कफ साठणे किरकोळ आजार देखील अंगावर काढू लागले आहेत. सततची वाढती आकडेवारी व प्रसारमाध्यमांमुळे वाढणार्या भीतीने नागरिक घाबरून आपले आजार लपवू लागले आहेत. घरच्या घरीच बरे होण्यासाठी विविध घरगुती उपाययोजना केल्या जात आहेत. अर्थात हे गैर नसले तरी, फॅमिली डॉक्टर व्हायरल इन्फेक्शन असल्याचे सांगत रुग्णांवर उपचार करत आहेत. यातील अनेकजण बरे देखील झाले असले तरी अनेकांमध्ये कसलीही सुधारणा न झाल्याने श्वास घेताना त्रास होणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्ण गंभीरावस्थेत गेल्याने त्यास अतिदक्षता विभागात हलवावे लागत आहे. त्यामुळे वाढता मृत्यदर कमी होत नाही. ही बाब हेरत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी थेट मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार खासगी दवाखान्यांना यापुढे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे अशा आजारांवर उपचारार्थ येणार्या रुग्णांची माहिती पालिकेला द्यावी लागणार आहे. नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांकडून स्थानिक पातळीवर व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण नवी मुंबईतील सेन्ट्रलाईज यादी तयार करण्यात आली आहे. त्यात नेहमी पालिकेकडून पुश मेसेज देण्यात येणार आहेत. या संदेशांमध्ये डॉक्टर्सनी रुग्ण तपासणीसाठी आल्यावर काय करावे काय करू नये याबाबत सतत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे वेळीच रुग्णाची टेस्ट केल्यावर व वेळीच उपचार मिळाल्यास रुग्ण प्राथमिक अवस्थेत बरा होऊन मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
अनेकजण ताप, सर्दी, खोकला येताच आपल्या लगतच्या दवाखान्यात जातात. त्या औषधांवर अनेक दिवस घालवतात. त्यामुळे अनेकदा कोरोना बळावतो व रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागते. तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे यापुढे दवाखान्यांना रुग्णांची माहिती पालिकेला द्यावी लागणार असणे वेळीच त्यांच्या टेस्ट केल्या जातील व उपचार केले जातील. त्यामुळे मृत्युदर आटोक्यात येण्यास मदत होईल.
– अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका, आयुक्त