पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार चाचणी
पुणे : प्रतिनिधी
कोरोना लस संशोधनात सर्वांत आघाडीवर असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची भारतात चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचणी करणार आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार देशाचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री उशिरा सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीची चाचणी करण्याची परवानगी दिली. कोविड-19च्या संदर्भात संपूर्ण चर्चा करून व शक्यतांचा अंदाज घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमधील एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार क्लिनिकल ट्रायलसाठी सुरुवातीला सुरक्षाविषयक डेटा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) यांच्याकडे द्यायचा असतो. या डेटाचे मूल्यांकन डेटा सुरक्षा निरीक्षण बोर्ड (डीएसएमबी) या संस्थेने केलेले असते. ऑक्सफर्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील निरीक्षणांचा अभ्यास केल्यानंतरच भारतात पुढील टप्प्यातील चाचणीला अनुमती देण्यात आली आहे.
लस देणार्या प्रत्येक व्यक्तीला चार आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देण्यात येतील. यात पहिला डोस दिल्यानंतर 29 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. त्यानंतर लसीची सुरक्षा आणि संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजची तपासणी केली जाईल. या चाचणीसाठी देशभरातून वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे.
ऑक्सफर्डच्या वतीने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी सध्या ब्रिटनमध्ये सुरू आहे. ब्रिटनमधील चाचणी तिसर्या टप्प्यात आहे. ब्राझीलमध्येही या लसीची तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे, तर आफ्रिकेतील देशांमध्ये पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे.