सम-विषम फॉर्म्युला बंद
मुंबई : प्रतिनिधी
येत्या 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुकाने उघडण्याची वेळ ही याआधी कमी होती तसेच ऑड-इव्हन तत्त्वावर ही दुकाने सुरू होती, परंतु आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत.
यामध्ये मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर मद्य हे घरपोचही देता येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास मात्र कारवाई केली जाणार आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधील दुकानेही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मॉलमधील थिएटर्स बंद राहतील, तर फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. यातच 5 ऑगस्टपासून जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली करण्यात येणार आहे, पण यासाठी काही नियमावली लागू करण्यात येणार आहे. सर्व संस्थांनी त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.