अलिबाग : प्रतिनीधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत शेतकर्यांना देण्यात येणार्या अनुदानासाठी रायगड जिल्ह्यातील 93 टक्के शेतकर्यांचे ई-केवायसी करण्यात आले आहे. या योजनेसाठी शेतकर्यांची ई-केवायसी करण्यात कोकणात रायगड जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019पासून पीएम किसान योजना सुरू केली. सातबारा असलेल्या पात्र शेतकर्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. चार महिन्यांनी एकदा दोन हजार रुपये या प्रमाणे हे अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर ई-केवायसी करावी लागते. खाते आधार संलग्न करावे लागते.
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवली होती. प्रत्येक तालुक्यात ही मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यात एक लाख 17 हजार 821 क्रियाशील शेतकरी आहेत. त्यापैकी एक लाख नऊ हजार 754 शेतकर्यांची ई-केवायसी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 93.15 टक्के शेतकर्यांची ई-केवायसी झाली असून 6.85 टक्के शेतकर्यांची करणे बाकी आहे.
शेतकर्यांची ई-केवायसी करण्यात कोकणात रायगड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 93.15 टक्के शेतकर्यांची ई-केवायसी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 86.61 टक्के, रत्नागिरी 85.15 टक्के, पालघर 81.80 आणि ठाणे 78.81 टक्के अशी ई-केवायसी करण्यात आली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या …