मानव जमातीच्या कोरोनाविरोधी लढ्यात जागतिक स्तरावर बुधवारचा दिवस कितीही नाकारले तरी लक्षवेधी निश्चितच ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी लसीच्या संदर्भातील घाई घातक असल्याचा इशारा दिला असला तरी रशियाने आपल्या कोरोनाविरोधी लसीची नोंद मंगळवारी केली आणि बुधवारपासून ही लस वितरित होणार आहे.
आपल्या देशातही कोरोनाला पराभूत करण्यासाठी चंग बांधण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण ज्या 10 राज्यांमध्ये आहेत, त्या 10 राज्यांनी कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळवल्यास आपण कोरोनावर मात करू शकू, असे आवाहन मोदीजींनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या चर्चेत केले. ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी अशा तर्हेची निकराची मानसिकता खरोखरीच आवश्यक आहे. ज्या लहान देशांनी गेल्या काही महिन्यांत या साथीला यशस्वी अटकाव केलेला दिसतो तेथील प्रयत्नांमागे हाच दृढनिश्चय होता. न्यूझीलंडचे नाव यासंदर्भात वारंवार घेतले गेले आहे. दुर्दैवाने मंगळवारीच या देशातील सर्वांत मोठे शहर ऑकलंड येथे कोरोनाच्या चार नव्या केसेस आढळल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी जाहीर केले. तब्बल 102 दिवसांनी या देशात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून अत्यंत यशस्वीरीत्या कोरोनाला अटकाव केल्याबद्दल न्यूझीलंडचे जगभरात कौतुक केले जात होते. बुधवारी दुपारपासून ताबडतोबीने ऑकलंडमध्ये पुन्हा कठोर लॉकडाऊन लागू होणार आहे. जगभरातील अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर साथीच्या दुसर्या लाटेचा सामना करावा लागलेला असल्यानेच आता सगळीकडेच साथीची दुसरी, तिसरी लाट येऊ नये यासाठीची खबरदारी घेतली जात आहे. भारतात मात्र राज्या-राज्यात परिस्थिती वेगळी असल्याने साथीचा उच्चांकही प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वेळी गाठला जाईल, असे तज्ज्ञांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांनी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. कोरोनाच्या प्रत्येक नव्या केसचे निदान 72 तासांच्या आत झाल्यास साथीला अटकाव करण्यास खूपच मदत होऊ शकेल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अर्थात प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची चाचणी 72 तासांच्या आत होणे आवश्यक आहे. लोकांनी आपला संपर्क कुणाशी येतो याबाबत सजगता बाळगल्यास, संपर्क मर्यादित ठेवल्यास हे शक्य होऊ शकेल, परंतु आपल्याकडे अनेक जण जणू काही कोरोना महामारी संपुष्टातच आली अशा थाटात हिंडू-फिरू-वावरू लागले आहेत. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि मृत्यूदरही खूपच कमी असला तरी आजही उशिरा निदान झाल्याने वेळेत उपचार होऊ न शकल्याने रुग्ण दगावत असल्याचे अनेक केसेसमधून दिसत आहे. साथीचा फैलाव होऊ नये याकरिता घ्यावयाच्या दक्षतांमध्ये ढिलाई येत चालली आहे. कोरोनावर आपण काही प्रमाणात नियंत्रण मिळवले असले तरी आपल्याकडे आणि जगभरातच अद्यापही केसेस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. टेस्टिंगचे प्रमाण मर्यादित असल्याने प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा कितीतरी कमी रुग्णांची नोंद सरकारदरबारी होते. सुरक्षित आणि प्रभावी लस वर्षअखेरीच्या आत बाजारात येण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतात तर व्यापक लसीकरण प्रत्यक्षात येण्यास आणखी वर्षभर तरी जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच सावधगिरीत ढिलाई न येऊ देता कोरोनाविरोधी लढा दृढनिश्चयाने लढण्याची गरज आहे.