भारतीय स्वातंत्र्याचा 73वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला असला तरी उत्साह कायम होता. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशाला स्वावलंबी बनविण्याबरोबरच देशवासीयांचे आरोग्य जपण्याचा निर्धार यंदा पंतप्रधानांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी… भारताला लाभलेले सक्षम व खंबीर असे नेतृत्व. ज्या देशाला जागतिक पातळीवर पूर्वी गौण मानले जात होते त्याच देशाला विचारात घेऊन आज प्रत्येक देश पाऊल टाकत असतो. नरेंद्र दामोदारदास मोदी नावाच्या कोहिनूर हिर्यामुळे देशाचा मान वाढला आहे. पंतप्रधान म्हणून ते लोकोपयोगी निर्णय, योजना, उपक्रम धडकपणे राबवून देश बलशाली करीत आहेत. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे पर्वणी असते. अभ्यासू व दूरदर्शीपणे ते एखादा विषय जनतेसमोर मांडून त्याची अंमलबजावणीही सार्वभोम पद्धतीने करीत असतात. यंदा त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भर हा शब्द मंत्र असल्याचे अधोरेखित केले. कोणत्याही राष्ट्राची ताकद ते किती स्वावलंबी आहे यावरून होत असते. आज अमेरिका, चीन यांसारखे देश विविध उत्पादने आपल्या देशातच तयार करून इतर देशांना त्यांची निर्यात करतात. आपल्याकडे निर्यात कमी आणि आयात जास्त अशी परिस्थिती आहे. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प सोडला आहे. वैश्विक महामारी कोरोनामुळे देश संकटात सापडला असताना देशातील नागरिकांसाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करताना पंतप्रधानांनी सर्वप्रथम आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘मेक इन इंडिया’तून ‘मेक फॉर वर्ल्ड’कडे वाटचाल करण्याचा निर्धार केला. देशासाठी गरजेच्या वस्तू देशातच बनवल्या गेल्या पाहिजेत, शिवाय त्यांची जगभर निर्यात केली पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. अलिकडच्या काही वर्षांमध्ये जगभरातील गुंतवणूकदारांचा कल भारताकडे वाढला आहे. जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता पूर्वीपासून भारतात आहे, परंतु आधीच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. बारा बलुतेदारांची पद्धत आपल्याकडे अस्तित्वात होती. यातून सर्वांना रोजगार मिळत असे. आजही देशातील नागरिकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. हे जाणून स्थानिक उद्योगांना चालना देऊन स्वावलंबी भारत घडविण्याचा पंतप्रधान मोदींचा मानस आहे. देशाच्या प्रमुखाकडून याहून चांगला विचार काय असू शकतो. देश विकासात नागरिकांचे योगदान आवश्यक असते. त्यासाठी त्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ असणे गरेजचे आहे. म्हणूनच आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य योजना सुरू होत असल्याचे जाहीर केले. या योजनेनुसार प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र देण्यात येणार आहे. सर्व आरोग्यसेवांसाठी त्याचा वापर करता येईल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत ही आरोग्य योजना राबवली जाणार आहे. आजारी व्यक्तीला उपचार घेताना अनेक अडचणी येत असतात. मुख्य म्हणजे खर्च खूप होत असतो. अशा वेळी आरोग्य ओळखपत्र उपयुक्त ठरणार आहे. देशात कोरोनावरील तीन लसी प्रगतिपथावर आहे. सद्यस्थितीत या महामारीवर मात करण्याला पंतप्रधान मोदींचे प्राधान्य असून, जनतेचे आरोग्य निकोप ठेवून स्वावलंबी भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!