Breaking News

बैलाला नाल मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा

पाली : प्रतिनिधी : शेतात राबणार्‍या व बैलगाडी ओढणार्‍या बैलांचे पाय चालताना घसरू नये व खुरांची वाढ थांबावी यासाठी त्यांच्या पायांना नाल मारली जाते. 10-15 वर्षांपूर्वी हा नाल मारण्याचा व्यवसाय तेजीत होता, मात्र ट्रॅक्टर-टेम्पो आले, तसेच शेतकर्‍यांनी शेतीकडे  पाठ फिरविल्यामुळे आपोआप बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय लोप पावू लागला आहे.

मागील 32 वर्षांपासून वडिलोपर्जित नाल मारण्याचा व्यवसाय करणारे येथील नजीर नालबंद म्हणाले की, बैलांच्या पायाला नाल मारण्याच्या व्यवसायात पूर्वी खूप चलती होती. दिवसाला कमाई देखील चांगली व्हायची. एखाद्याकडे 10 बैलजोड्यांना नाल मारल्या आणि त्याने एका जोडीचे पैसे उधार ठेवले, तरी परवडायचे, मात्र आता एका बैलजोडीला पत्री मारल्यावर उधारी केल्यास हाती काहीच मिळत नाही. याआधी बैलगाडी व्यवसाय व शेतीची कामे सुरू असल्याने वर्षातून दोन-तीन वेळा एका बैलाला पत्री मारली जायची, मात्र आता एकदाच पत्री मारतात. बैलगाडीवाल्यांला आता कोणी विचारत नाही. शेतीकडेही आता शेतकरी पाठ फिरवू लागले आहेत. त्यातच ट्रॅक्टर-टेम्पोमुळे बैल वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बैलांच्या पायाला पत्री मारण्याच्या व्यवसायात आता मजा राहिली नाही.

एका बैलाला पत्री मारण्याचे 300 रुपये मिळतात, मात्र नाल, खिळे, साहित्य व प्रवास खर्च मिळून हाती फारच थोडी रक्कम राहते. मुंबईवरून पत्रे (नाल), तर पुण्यावरून खिळे आणावे लागतात. नजीर जिल्ह्यात विविध ठिकाणी आपले साहित्य घेऊन फिरतात, मात्र धंदा फारच कमी होतो. त्यांचा मुलगा व भाचादेखील या व्यवसायात आहे, मात्र त्यांचेही भविष्य टांगणीला लागले असल्याचे नजीर यांचे म्हणणे आहे.

जीवितास धोका

पायाला नाल मारण्यासाठी जनावरे खाली पाडताना खबरदारी घ्यावी लागते, चलाखी करावी लागते. बर्‍याच वेळा बैल लाथ मारतात. त्यामुळे छाती, तोंड, डोके, पोट अशा शरीराच्या विविध अवयवांना दुखापत होते. बैल हिसडा (हिसका) देतो. त्यामुळे हाताचे खांदेदेखील निसटतात. बर्‍याच वर्षांपूर्वी बैलाने हिसका दिल्याने नजीर नालबंद यांचा डाव्या हाताचा खांदा निसटला आहे. या जखमा शरीरावर घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम करावे लागते.

शेती फारसे कोणी करत नाहीत, ट्रॅक्टर व टम्पो आले. त्यामुळे बैलांच्या पायाला नाल मारण्याचा व्यवसाय पूर्णपणे बसला आहे. जेमतेम आणखी दोन वर्षे हा व्यवसाय चालेल.

-नजीर नालबंद, नाल व्यावसाईक, पाली, ता. सुधागड

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply