Breaking News

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा

मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

राज्यात उन्हाच्या झळा असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल आदी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. राज्य सरकारने 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने 4714 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठकसुद्धा घेण्याची नितांत गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

वार्षिक आराखड्यात यापूर्वीच मंजूर असलेल्या विविध प्रकारच्या कामांच्या निविदा बोलावणे, निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे, कामांचे कंत्राट देणे यालासुद्धा परवानगी देण्यात यावी. रुग्णालयीन सुविधा, रस्त्यांची कामे, महापालिका व गाव पातळीवरची कामे आदींचा यात समावेश आहे. जी कामे पूर्वीपासून सुरू आहेत, त्याचा वेळोवेळी आढावा घेण्याची अनुमती या पत्रातून मागण्यात आली आहे. यासाठी मंत्र्यांच्या दौर्‍यांनाही अनुमती प्रदान करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 2009मध्ये अशाच प्रकारची अनुमती प्रदान करण्यात आली होती, याकडेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे. ही अनुमती दिल्यास दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply