पुणे : प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणरायाच्या मूर्तीचे विसर्जनदेखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली.
मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन आदींची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. यंदाचे वर्ष लोकमान्य टिळक यांचे स्मृतिशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट रोजी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी केसरीवाड्यात आरती करून लोकमान्यांना मानवंदना देणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.