कर्जत : बातमीदार
केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या मिशनमध्ये सातत्यपूर्ण सहभाग आणि ते मिशन पूर्ण करण्यासाठी केलेल्या अंमलबजावणीसाठी रायगड जिल्हा परिषदेने कर्जत तालुक्यामधील 10 ग्रामपंचायतींचा सन्मान केला. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कर्जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीत या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवकांचा सन्मान केला.
कर्जत तालुक्यात 53 ग्रामपंचायती आहेत. पाषाणे, हुमगांव आणि उकरूळ या ग्रामपंचायतींनी जलजीवन मिशनमध्ये, ओलमण, नांदगाव, अभेरपाडा या ग्रामपंचायतींनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये आणि जामरुंग, चिंचवली, वैजनाथ या ग्रामपंचायतींनी कर वसुलीमध्ये प्रभावीपणे काम केले असल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सन्मानित केले. संबंधीत ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी यांनी हे सन्मान स्वीकारले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे, गटविकास अधिकारी साबळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी सी. एस. राजपूत, गटशिक्षण अधिकारी सुषमा हिरवे आदी उपस्थित होते.