Breaking News

भातशेतीला झोडपल्याने शेतकरी हवालदिल

कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीच्या पावसाचा तडाखा

माणगाव : प्रतिनिधी
खरीप हंगामातील भातशेती सध्या कापणीस तयार होत आहे. कोरोना साथीच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत, मात्र परतीचा पाऊस भातशेतीला झोडपून काढत असून, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना आता परतीच्या पावसाचा फटका बसत आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार बरसणारा पाऊस यामुळे लोंबी धरलेली भातशेती झोडपून निघत आहे. दररोज येणार्‍या पावसामुळे भातशेती संकटात सापडली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जूनपासून सुरू झालेल्या पावसाने भातशेतीच्या पेरणी व लावणीची कामे वेळेत झाली होती. तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी 90 दिवसांत तयार होणारी भाताची जात लागवड केली होती, तर काही भातशेती 120 दिवसांत तयार होणारी आहे. सुरुवातीपासून सतत पडलेल्या पावसाने भातशेती तरारून आली आहे, मात्र सध्या दररोज हजेरी लावणारा व वार्‍या वादळासह येणारा पाऊस लोंबी धरलेल्या भातशेतीला झोडपून काढत आहे. यामुळे उभे असलेले पीक जमिनीलगत वाकले आहे. परिणामी तयार झालेले भाताच्या लोंबीचे नुकसान होत आहे. पाऊस असाच शेतीला झोडपत राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल, या चिंतेने शेतकरी धास्तावला आहे.

भातशेती कापणीस तयार होत आहे, मात्र दररोज येणार्‍या परतीच्या पावसाने उभे पीक आडवे होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास पिकाचे नुकसान होईल. कोरोनामुळे रोजगार बंद आहेत. निसर्ग चक्रीवादळाने घरांचे नुकसान झाले आहे. आता परतीच्या पावसाचा तडाखा बसत असून, शेती जमीनदोस्त होत आहे.
-बाळाराम भोनकर,शेतकर

वादळी वारा आणि गडगडाटी पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. लोंबीत धरलेला भात झोडपून पडल्याने पळज निर्माण होईल व शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागेल. या वर्षी तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
-संदीप खडतर, अध्यक्ष, आत्मा शेतकरी संघटना, माणगाव

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply