देवेंद्र फडणवीस यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारला आता असे वाटतेय की कोरोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचे आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील 50 टक्के क्षमता जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील, असेही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
या सरकारला आता कोरोना नाही तर कंगनाशी लढायचे आहे असे वाटत आहे. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांना कोणती चौकशी करायची आहे ते करू शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे, पण कुठेतरी गांभीर्याने कोरोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करू वैगेरे सूर आहे त्यापेक्षा जास्त करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यातील 50 टक्के क्षमता तरी करोनाशी लढण्यात वापरा, कदाचित लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात रोज कोरोनाचा आकडा वाढत आहे. देशातील 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे, पण कोरोनासोबत लढायचे सोडून सरकार कंगनाशी लढत आहे. कंगनाचा मुद्दा भाजपने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतके महत्त्व कशाला दिले. तुम्ही जाऊन तिचे घर तोडले असे सांगत, त्यांनी कंगना भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप फेटाळला.