Breaking News

कर्नाळा किल्ल्यावर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

पनवेल : बातमीदार

कर्नाळा किल्ल्यावर अडकून पडलेल्या चौघांना तालुका पोलीस, वन विभाग आणि निसर्ग मित्र सह्याद्री प्रतिष्ठान ट्रेकर्सच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. हे चौघेही एका कार्यालयात काम करीत होते. बापू चव्हाण (कामोठे), सायली जाधव (ऐरोली), श्रुती कदम (मुंबई सेंट्रल), कीर्ती पुरोहित (खारघर) अशी या चौघांची नावे आहेत. कर्नाळा किल्ल्यावर चढताना अनेक वाटा मळलेल्या असल्याने पर्यटकांना कोणत्या रस्त्याने जायचे ते समजत नाही. त्यामुळे येथे किल्ला सर करण्यासाठी येणारे काही पर्यटक रस्ता शोधताना भरकटतात. मंगळवारी शिवजयंतीच्या निमित्ताने चार जण कर्नाळा किल्ल्यावर निघाले. सकाळी त्यांनी किल्ला सर करण्यास सुरुवात केली. त्यांना किल्ल्याची वाट माहिती नसल्याने ते भरकटले व मूळ रस्ता सोडून अन्य रस्त्याने वर जाऊ लागले. काही वेळानंतर पाठीमागच्या रस्त्याने जाऊ लागल्यानंतर त्यांना पुढे अथवा मागे जाणेदेखील शक्य होत नव्हते. या वेळी आपण रस्ता चुकलो असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यातील एकाने 100 क्रमांकावर कॉल केला व चौघे कर्नाळा किल्ल्यावर अडकले असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर संबंधित कॉलची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित झाजुरणे, हवालदार अमृत शिंदे, नाईक विद्याधर गायकवाड, संतोष चिकणे, प्रशांत करंजकर, संदीप चौधरी व वन विभागाचे वनपाल युवराज मराठे, निसर्ग मित्र सह्याद्री प्रतिष्ठान ट्रेकर्स ग्रुपचे अनंता पाटील व सतीश हातमोडे (तुरमाळे) यांच्या मदतीने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बापू चव्हाण, सायली जाधव, श्रुती कदम, कीर्ती पुरोहित या चौघांना सुरक्षित खाली उतरवून सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply