पाली ः प्रतिनिधी
पाली येथील 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. या घटनेचे सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांत तीव्र पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात पाली पोलीस स्थानकात संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपीस लवकरात लवकर कठोर शासन व्हावे, अशी मागणी सुधागडातील आदिवासी समाजाने केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पाली पोलीस स्थानकात दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. हे निवेदन पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी स्वीकारून या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी कातकरी समाज एकजुटीने सरसावला आहे. या प्रकरणाकडे आमचे बारकाईने लक्ष असेल, असे आदिवासी कातकरी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे व आदिवासी समाजनेत्यांनी म्हटले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी रमेश पवार यांनी केली आहे. या घटनेप्रकरणीचे निवेदन देताना आदिवासी कातकरी समाजाचे सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, आदिवासी विकास परिषद कोकण संघटक रमेश पवार, आदिवासी समाज नेते कृष्णा वाघमारे, विश्वास भोय, दगडू वाघमारे, वामन वारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.