Breaking News

हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराचे स्मारक होणार की नाही?

नात सूनेचा राज्य सरकारला सवाल

कर्जत : बातमीदार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानिवली गावचे गोमाजी पाटील व त्यांचे पुत्र हिराजी हेही हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय असून, ते कोसळू शकते, मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक घराचे स्मारकात रूपांतर होणार आहे की नाही, असा सवाल त्यांची नात सून अनसूया गोपाळ जामघरे यांनी केला आहेे.

कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे गोमाजी पाटील हे एकुलता एक मुलगा हिराजी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगड येथे फितुरीने घात होऊन भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले. गोमाजी पाटील यांनाही अटक झाली होती. 1947मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गोमाजी पाटील सुटले आणि पत्नी ठकाबाई, सून जानकीबाईसह मानिवलीला राहात होते. गोमाजी पाटील यांना आधार राहिला नसल्याने त्यांनी भविष्याचा विचार करून बिरदोले येथील 10 वर्षांच्या नातेवाइक मुलाला कायमचे ठेवण्यासाठी म्हणून आपल्याकडे आणले. 1954 साली त्या मुलाचे म्हणजेच गोपाळ जामघरे यांचे लग्न खाडेपाडा येथील अनसूया नावाच्या मुलीबरोबर लावून दिले. जामघरे दाम्पत्याने गोमाजी पाटील आणि जानकीबाई यांची सेवा केली. 1961 साली गोमाजी आणि 1967 साली जानकीबाई यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी पाटील यांचे घर त्यांच्या पुतण्याने पाडले आणि अनसूयाबाईंनी पतीच्या निधनानंतर पडीक गोठा बांधण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक पातळीवरून त्यांना विरोध झाला होता.

ज्या घरात हुतात्मा हिराजी पाटील यांचा जन्म झाला, जानकीबाई पाटील यांनी संसार केला त्याच घरात आपण सून म्हणून प्रवेश करून क्रांतीवीर गोमाजी पाटील आणि जानकीबाई पाटील यांची सेवा केली. या घरात क्रांतिकारकांच्या अनंत आठवणी आहेत. त्यामुळे गोमाजी पाटील यांच्या घराच्या ठिकाणी स्मारक उभारून पुढच्या पिढीसमोर देशभक्तीचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी वयाच्या 83व्या वर्षी अनसूया जामघरे लढत आहेत. मानिवली येथील हुतात्म्यांच्या आणि आपल्या पडीक घराची दुर्दशा झाल्याने त्या तेथे राहत नाहीत. त्या बदलापूर येथे मुलीकडे राहातात. देशप्रेमी नागरिक साथ देतील अशी अपेक्षा करीत त्या घराच्या जागी स्मारक उभारण्यासाठी लढा देत आहेत. दरम्यान, याबाबत आझाद दस्त्याचे संशोधक गिरीश कंटे यांनी, राज्य शासनाने त्यांचे घर हे स्मारक करायला हवे होते, पण शासनाने असे काही केले नाही आणि करण्याची वृत्ती दिसत नाही. त्यामुळे हुतात्मा हिराजी पाटील यांचे कुटुंबीय घराची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर त्यास कोणी अडवणूक करू नये, असे आवाहन केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply