अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळ सुरु असलेल्या अड्ड्यावर अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने धाड टाकली. या धाडीत ऑनलाईन जुगार खेळणार्या आणि जुगार अड्डा चालवणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड शहरातील अंबिका कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये एका जनरल स्टोर्सच्या नावाने सुरु असलेल्या दुकानात ऑनलाईन पद्धतीने जुगार सुरु होता. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (दि. 9) या इमारतीमध्ये सायंकाळी साडे सहा ते साडे नऊ या वेळेत धाड टाकली. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये समीर दशरथ कविसकर (वय 33), आयुब अली संगमेश्वरी (वय 52), दत्तात्रय देशमुख, किशोर कोंडीराम पाटील, नरेश मनोहर डोंबे, विनोद बाळकृष्ण बेंदूगडे, राजू सखाराम पाटील, बाळकृष्ण तलाठी, अतुल माने, दत्तात्रय काडकने, आणि बापू नावाचा समावेश आहे. या सर्वांवर गैरकायदा आणि विनापरवाना लायन क्लब नावाचे सॉफ्टवेअर वापरून ऑनलाईन पद्धतीने जुगार अड्डा चालवल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत 11 संगणक, एक राउटर, एक मोबाईल, रोख रक्कम असा एकूण एक लाख सात हजार 570 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5, व माहिती तंत्रज्ञान 2000 कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. सी. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. ए. शेख हे अधिक तपास करीत आहेत.