Breaking News

सत्कार समारंभांमुळे निरज अस्वस्थ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राला गेल्या 13 ऑगस्टला आपल्या राज्य (हरयाणा) सरकारतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याला हजर राहायचे होते, मात्र त्या वेळी ताप असल्याने तो या सोहळ्याला हजर राहू शकला नव्हता. हा समारंभ बुधवारी पुन्हा आयोजित करण्यात आला अन् नीरजने त्याला हजेरी लावली. भारतात दाखल झाल्यापासून नीरजला सातत्याने सत्कार सोहळे, प्रसार माध्यमांच्या मुलाखतींना उपस्थित राहावे लागत आहे. पुरेशी झोप मिळणेही कठीण झाले असल्याने त्याला गेल्या काही दिवसांपासून तापाचा त्रास जाणवत आहे.

गेल्या मंगळवारी नीरजचे कुटुंबीय आणि त्याच्या खंडारा गावातील शेजार्‍यांनी जंगी स्वागत समारंभ आयोजित केला होता. मात्र नीरजच्या अंगातील ताप वाढल्यामुळे त्याला समारंभ अर्धवट सोडून जवळच्याच रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. नीरजला रुग्णालयात न्यावे लागले नसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा ताप शंभरपर्यंत होता. त्यासोबतच घशाचा त्रासही जाणवत होता. नीरजला चक्कर आल्यासारखेही होत होते. नीरजने 7 ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. 9 ऑगस्ट रोजी तो भारतात दाखल झाला. तेव्हापासून दहा दिवस तो कुटुंबीयांपासून दूर होता.

दिल्ली ते पानीपत अशा रस्तेमार्गाने नीरज गावी दाखल झाला होता. त्याच्या घरापासून काही अंतरावर असणार्‍या हल्दाना गावापाशी आल्यावरच त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. दिल्ली ते नीरजचे खंदारा गाव हा प्रवास एरवी दोन तासांचा आहे. मात्र त्याची मोटार जशी हरयाणात दाखल झाली, त्यासोबतच विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या सत्कार समारंभासाठी थांबावे लागत होते. यामुळे हा दोन तासांचा प्रवास सहा तासांचा झाला. नीरजला पाहणे, भेटणे याबाबत प्रत्येकाला उत्सुकता वाटणे सहाजिकच आहे; पण यामुळे करोना प्रतिबंधक नियम मात्र पायदळी तुडवण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply