खासगी पार्किंग रोखण्यासाठी पाऊल
रोहा : प्रतिनिधी – रोहा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्क होत असल्याने बसचालकांना गाडी बाहेर नेताना व आणताना त्रास होत असे. म्हणून रोहा बसस्थानकाच्या उजवीकडचे (कोलाड बाजूकडील) प्रवेशद्वार आगाराकडून बंद करण्यात आले आहे. आता बसस्थानकात डावीकडून म्हणजेच चणेरा बाजूने बस ही स्थानकात आणली जाते व येथूनच बाहेर मार्गस्थ होते.
रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात बाजारासाठी आलेले नागरिक दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करीत होते. खासगी गाडी बसस्थानकात पार्किंग करून बाजारहाट करत असताना ती गाडी स्थानकात तासन्तास उभी राहत असल्याने बसेसना स्थानकात येता-जाता अडथळा निर्माण होत होता. हे बसस्थानक खाजगी वाहनांचे वाहनतळ बनले होते. या बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना नेहमीच खासगी वाहनधारक व बसचालक यांच्यात संघर्ष होत असते. महत्त्वाचे म्हणजे कारवाई करूनही खासगी वाहनधारक बसस्थानकात गाड्या पार्किंग करीत होते. शेवटी रोहा आगाराने यावर कायमचा बंदोबस्त म्हणून उजवीकडचे प्रवेशद्वार तात्पुरते बंद केले आहे. या प्रवेशद्वारासमोर महामंडळाची बसच आडवी उभी केल्याने खासगी वाहनांना प्रवेश बंद झाला आहे. त्यामुळे रोहा बसस्थानक आता मोकळे झाले आहे.