Breaking News

मुख्यमंत्री कार्यालयाच्या गोंधळामुळे डॉ. आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द

मुंबई : प्रतिनिधी
इंदू मिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा शुक्रवारी (दि. 18) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती, तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे नमूद करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पना नव्हती. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती. चक्क महाआघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनादेखील निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे.
या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले गेले नव्हते. आनंदराज यांना शुक्रवारी सकाळी निमंत्रण देण्यात आले. कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते, मात्र कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती. त्यामुळे या सगळ्या गोंधळासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍यांना जबाबदार धरले जात आहे.
…अन् अजित पवार माघारी फिरले!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांना बसला. या कार्यक्रमासाठी पवार हे पुण्याहून मुंबईसाठी येत होते. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार होता, मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहोचलेले पवार यू-टर्न घेत पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

Check Also

सिडकोच्या अभय योजनेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी …

Leave a Reply