Breaking News

अनलॉक जरा जपून

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नेहमीप्रमाणेच अनलॉकविषयीची उत्कंठा वाढलेली असताना राज्य सरकारने हॉटेले, फूड कोर्ट आणि बार सुरू करण्याची घोषणा केली. परंतु त्याचवेळेस माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर आढळूून आल्याच्या वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘आता तरी कोरोना चाचण्या वाढवा’ ही त्यांची मागणी सरकारला गांभीर्याने विचारात घ्यावीच लागेल.

महिनाअखेरीला अनलॉकची चर्चा जोरात असते. काय खुले होणार, काय बंद राहणार याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. सप्टेंबर अखेरीला देश पातळीवर कोरोना संबंधित आकडेवारीत दिलासादायक घसरण दिसून आल्याने जनजीवन आणखी सुरळीत होण्याच्या अपेक्षा उंचावल्या. पण देशात कोरोनाच्या थैमानाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील परिस्थिती आजही चिंताजनकच आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून काही व्यवहार नव्याने सुरू करणे भागच आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने येत्या 5 तारखेपासून हॉटेले, रेस्टॉरंट, फूड कोर्ट आणि बार सुरू करण्याची घोषणा केली आहे. 50 टक्के क्षमतेने ही ठिकाणे सुरू होणार आहेत. अनलॉकच्या दिशेने हे आणखी एक पाऊल असले तरी याचा अर्थ राज्यातील कोरोना आघाडीवरील परिस्थिती सुधारते आहे, असे मात्र नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या काळापासून सातत्याने परिस्थितीचा तपशीलात जाऊन अंदाज घेत सरकारचे लक्ष वारंवार वास्तवातील भीषणतेकडे वेधले आहे. आताही अनलॉकच्या हवेत दक्षतेविषयीची बेफिकीरी वाढीस लागलेली असताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात दिसून आल्याच्या वास्तवाकडे त्यांचे लक्ष वेधले. ‘सहा महिने गेले, किमान आता तरी कोरोना चाचण्या वाढवा’ अशी मागणी फडणवीस यांनी या पत्रात केली आहे. वास्तवाचे गांभीर्य अधोरेखित करून वारंवार त्याकडे लक्ष वेधल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेने खरोखरीच फडणवीस यांचे आभार मानायला हवेत. राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला आहे. जुलैपेक्षा सप्टेंबर महिन्यात संसर्गाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ झाली असली तरी राज्यातील महाआघाडी सरकारने हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली नाही. फडणवीस यांनी सातत्याने पत्रे पाठवून देखील राज्य सरकार चाचण्यांच्या बाबतीत पुरेसे गंभीर दिसत नाही. त्यामुळेच राज्यातील कोरोना संसर्ग आजही कमी होताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात चाचण्यांची संख्या 42 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात ऑगस्टच्या तुलनेत केवळ 26 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये रोज सरासरी 37 हजार 528, ऑगस्टमध्ये रोज सरासरी 64 हजार 801 तर सप्टेंबरमध्ये रोज 88 हजार 209 चाचण्या करण्यात आल्या. एकीकडे सरकार चाचण्यांची संख्या दीड लाखापर्यंत वाढवण्याबद्दल बोलत असताना प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे. ऑगस्ट महिन्यात संसर्गाचे प्रमाण जुलैपेक्षा कमी झाले. पण सप्टेंबरमध्ये ते चार टक्क्यांनी पुन्हा वाढले. मुंबईतील संसर्गाचा दरही सप्टेंबरमध्ये वाढला आहे. जिथे जिथे संसर्गाचा दर वाढतो आहे, तिथे तिथे चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. येणारा काळ सणासुदीचा असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहेच. तेव्हा अनलॉक जरा जपूनच हे राज्य सरकार जाणून असलेले बरे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply