Breaking News

चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली पोलखोल

मुंबई ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यावर शुक्रवारी (दि. 28) भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते.
दरेकर यांच्यासमवेत भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार भाई गिरकर, अ‍ॅड. निरंजन डावखरे, रमेश पाटील व माजी आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, विरोधी पक्षाकडून सातत्याने आलेला दबाव, आग्रही मागणी, देवेंद्रजी आणि माझा झालेला दौरा यामुळे सरकारने मदतीचा निर्णय अखेर जाहीर केला असला तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. मदत जाहीर करताना सरकारकडून कोणत्याही प्रकारचे माणुसकीचे दर्शन किंवा कोकणवासीयांविषयीची आस्था दिसून आलेली नाही. एक औपचारिकता पूर्ण करावी अशा प्रकारे सरकारने मदत जाहीर केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मोदीजींनी दोन हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. याचा संदर्भ देऊन दरेकर म्हणाले, एका बाजूला संजय राऊत हे केंद्राने दोन हजार कोटी द्यावेत अशी मागणी करतात. अर्थात, त्यांनी कुठल्या अभ्यासानुसार दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली होती हे कळायला मार्ग नाही, पण केंद्राने दोन हजार कोटी द्यावेत अशी अपेक्षा धरताना राज्य सरकारने केवळ 252 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे यांची मागणी आणि मदतीची घोषणा यात कोणताही वस्तुनिष्ठ अभ्यास नाही. हे सर्व कोकणवासीयांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे असून मदतीची घोषणा निव्वळ फसवी आहे.
कोकणवासीयांचा आक्रोश कमी करण्याऐवजी वाढवण्याचे काम राज्य सरकारच्या या निर्णयामधून झाले आहे.
सरकारने जाहीर केलेली मदत तत्काळ कोकणवासीयांना मिळाली नाही, जे घटक वंचित राहिले आहेत त्यांचा समावेश केला नाही आणि मदतीच्या रकमेत वाढ केली नाही तर कोकणातील माझ्या सहकारी आमदारांबरोबर मी उपोषणाला बसेन, असा इशाराही दरेकर यांनी या वेळी दिला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply